मुंबई-पुण्याचा प्रवास ३ तासात नाही तर केवळ २० मिनिटात

प्रवास सोपा करण्यासाठी सुपरसॉनिक मोड विकसित करणाऱ्या अमेरिकन कंपनीने महाराष्ट्रासोबत करारावर स्वाक्षऱ्या केल्या. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 19, 2018, 03:17 PM IST
मुंबई-पुण्याचा प्रवास ३ तासात नाही तर केवळ २० मिनिटात  title=

मुंबई : प्रवास सोपा करण्यासाठी सुपरसॉनिक मोड विकसित करणाऱ्या अमेरिकन कंपनीने महाराष्ट्रासोबत करारावर स्वाक्षऱ्या केल्या. 

या करारानुसार वाहतूक व्यवस्थेचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि पुणे दरम्यान तीन तासाचा प्रवास केवळ वीस मिनिटात होणार आहे.

करारावर स्वाक्षऱ्या  

राज्य सरकार आणि पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाने गुरुवारी यासंदर्भातील करार केला आहे. व्हर्जिन हायपरलूप वन या कंपनीसोबतच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. 

मुंबई पुण्यासाठी २० मिनिटे

१००० किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास होणार असून  मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास फक्त १३ मिनिटांत पूर्ण होईल असा दावा कंपनीने केलाय. 

५ हजार प्रवासी, १२०० भाडे

एवढंच नाही हे तंत्रज्ञान राबवण्याआधी या मार्गावर, तासाला ५ हजार प्रवासी संख्या असणे देखील आवश्यक आहे.

हायपर लूप ही मेट्रोप्रमाणे कॉलमवर उभारली जाते.यासाठी अंदाजे भाडे असणार आहे १२०० रूपये असण्याची शक्यता आहे. 

सध्या आखाती देशात दुबई-दोहा दरम्यान हायपर लूपचं काम सुरू आहे. हायपर लूप राबवणारी कंपनी ही अमेरिकन आहे.

देशात ३ ठिकाणी हायपर लूप

मुंबई ते पुणे, बंगळुरू ते चेन्नई आणि आंध्रप्रदेशमध्ये अंबरावती ते विजयवाडा या तीन ठिकाणी हायपर लूप विचाराधीन होतं, मात्र बंगळुरू ते चेन्नई अंतर जास्त असल्याने ते तेथे होणे शक्य नाही. आंध्रप्रदेशमध्ये अंबरावती ते विजयवाडा दरम्यान ही प्रवासी संख्या तासाला ५ हजार नसल्याने तेथेही होणे शक्य नाही.

अंतर कमी आणि सरळ रेषेत असावं

हायपरलूपचं आणखी एक महत्वाची आणि आवश्यक बाब म्हणजे हे अंतर सरळ रेषेत असावं लागतं.

मुंबई आणि पुणे दरम्यान अंतर कमी आहे, सरळ रेषेत हायपरलूपचं काम होणार आहे का हे देखील पाहता येईल, याचा अहवाल ६ आठवड्यात येणार आहे.

जगात अजून हायपर लूप कुठेही नाही

हायपर लूपविषयी दुसरी महत्वाची बाब म्हणजे, जगात अशा प्रकारची सेवा अजून कुठेही अस्तित्वात आलेली नाही.

आखाती देशात दुबई ते दोहा दरम्यान हायपर लूपचं काम सुरू आहे. एकविसाच्या शतकाच्या दृष्टीकोनातून या स्मार्ट वाहतुकीकडे पाहिले जात आहे.