एक ग्रामपंचायत... सरपंचाविना!

ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली. 

Updated: Oct 25, 2017, 11:19 PM IST
एक ग्रामपंचायत... सरपंचाविना! title=

जितेंद्र शिंगाडे, प्रतिनिधी, झी मीडिया, नागपूर : ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली. दोन टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच थेट लोकांमधून सरपंचाची निवड करण्यात आली, मात्र नागपूर जिल्ह्यातलं एका गावाला सरपंचच मिळालेला नाही.

नागपूर ग्रामीण तालुक्यातील खंडाळा गावात ग्राम पंचायत निवडणुकीच्या धामधूमीनंतर सध्या सर्वत्र शांतता आहे. ग्रामपंचायतीचे 7 सदस्य निवडून आले. आता केवळ सरपंच निवडायचा शिल्लक आहे. कारण पार पडलेल्या निवडणुकीत या गावातून सरपंच पदासाठी एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलाच नाही.

खंडाळा गावाचे सरपंचपद अनुसूचित जमातींसाठी राखीव करण्यात आले होते. मात्र गावात अनुसूचित जमातीचा एकही व्यक्ती नसल्याने सरपंच पदाकरिता अर्जच दाखल करण्यात आला नाही. याविषयी निवडणूक अधिकारी, राज्याचे मुख्य सचिव आणि जिल्हाधिकारी कार्यालयाशी वारंवार पत्रव्यवहार केला मात्र याचा काहीच फायदा झाला नसल्याचे गावातील नेते सांगतात.

शेजारच्या मध्यप्रदेश, छत्तीसगढ राज्यातून शेतमजूर कामासाठी येतात. 2011 साली करण्यात आलेल्या जनगणनेत 102 अनुसूचित जमातींच्या नागरिकांची नोंद करण्यात आली. याच जनगणनेच्या आधारावर यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंचपद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले. मात्र हे शेतमजूर काही महिने राहिल्यावर आपल्या मूळ गावी परत जातात.

सद्य परिस्थितीत खंडाळामध्ये केवळ तीन अनुसूचित जमातीचे नागरिक आहे. मात्र ते देखील मध्य प्रदेशातील असल्याने निवडणूक लढवण्याच्या अटी, शर्थीची पूर्तता करता येत नसल्याने त्यांना स्थानिक निवडणूक लढता येत नाही.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सध्या हे गाव सरपंचाविना राहिलंय. यावर पर्याय शोधून सरपंचाचा हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येणार असल्याचे प्रशासन सांगतंय.

अनुसूचित जमातीचे आरक्षण काढावे यासाठी ग्रामपंचायतीने 2016 मध्ये ठरावदेखील मंजूर केला होता. जनगणनेच्या आधारावर खंडाळ्याचे सरपंच अनुसूचित जमाती करिता राखीव ठेवण्यात आले होते. मात्र जनगणनेत ज्या अनुसूचित जमातींच्या नारीकांना सामील करण्यात आले होते ते स्थलांतरित नागरिक होते. प्रशासनाची हीच घोडचूक आता खंडाळा  ग्रामपंचायतीच्या पथ्यावर पडलीय. यामुळे बिना सरपंचाची ग्रामपंचायत म्हणण्याची वेळ खंडाळ्यावर आलीय.