दोन 'वधू', 'वर' मात्र एकच... अनोख्या लग्नाची हृदयस्पर्शी कहाणी

नांदेड जिल्ह्यातील कोटग्याळ इथं हा सोहळा संपन्न झाला. 

Updated: May 6, 2018, 06:48 PM IST

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : एका लग्नाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात एका नवरदेवानं दोन मुलींशी लग्न केल्याचं पाहायला मिळतंय. एकाच मांडवात नवरदेवाचा दोन सख्ख्या बहिणींशी विवाह... लग्नपत्रिकाही आली छापून... लग्नपत्रिकेवर दोन वधू आणि वर एकच... सगळ्यांच्या संमतीने हा सोहळा संपन्न झाला. मात्र मंडळी या लग्नाची गोष्ट अनोखी आणि कारण काहीसं हृदयस्पर्शी असंच आहे.

वरासमोर बहिणीची अट 

नांदेड जिल्ह्यातील कोटग्याळ इथं हा सोहळा संपन्न झाला. इथले अल्पभूधारक शेतकरी गंगाधर शिरगिरी यांना तीन मुली... मात्र, मोठी मुलगी जन्मापासून थोडी गतिमंद... शिवाय ती नेहमी आजारीही असते... याच कारणामुळे कुणीही तिच्याशी लग्न करण्यासाठी तयार नव्हतं... छोट्या मुलीसाठी स्थळं आली... नात्यातल्या मुलाशी तिचं लग्नही जमलं. मात्र, आपल्यानंतर आपल्या गतिमंद बहिणीचा सांभाळ कोण करणार? यासाठी तिनं नियोजित वरासमोर अट घातली. 

आपल्यासह बहिणीला स्वीकारलं तरच लग्न करु अशी काहीशी अट तिने त्याला घातली. दोन्ही बाजूच्या मंडळींनी त्याला संमती दिली आणि २ मे रोजी थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला. 

एकाच नवरदेवाचा दोघींसोबत विवाहाची ही बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली... लग्नपत्रिका आणि त्यांच्या लग्नाचा फोटो एका दिवसात प्रचंड व्हायरल झाला. या लग्नाबद्दल अनेकांना कुतूहल निर्माण झालं... मात्र, त्याचा या दोन्ही कुटुंबांना मोठा मानसिक त्रास झालाय. 

एकाच मांडवातल्या या अनोख्या लग्नाच्या उलट-सुलट चर्चा रंगल्या. मात्र, या लग्नामागची गोष्ट म्हणजे एका बहिणीचे बहिणीसाठी असलेले जीवापाड प्रेम... कायद्याच्या संज्ञेत हा विवाह बसत नसला तरी माणुसकी आणि नात्यातील प्रेमाचे बंध यामुळे हे लग्न अनोखं ठरलं आहे.