धक्कादायक : पोटात गर्भ असताना तिनं दोनदा 'केमोथेरपी' घेतली पण...

'रेलिगेअर' पॅथॉलॉजी लॅबविरुद्ध पीडित महिला डॉक्टरनं ग्राहक न्यायालयात तक्रार केली

Updated: Mar 6, 2019, 05:10 PM IST
धक्कादायक : पोटात गर्भ असताना तिनं दोनदा 'केमोथेरपी' घेतली पण... title=
प्रतिकात्मक फोटो

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : वैद्यकीय व्यवसायाचं किती पतन झालंय, याचा धक्कादायक अनुभव नाशिकमध्ये एका महिला डॉक्टरलाच आला... केवळ पैसे कमावण्याच्या नादात रुग्णांच्या आयुष्याशी कसा खेळ सुरूय, पाहा हे धक्कादायक वास्तव... ही महिला स्वत: होमिओपथी डॉक्टर आहेत. नाशिक रोड परिसरात त्यांचा दवाखाना आहे. पण वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांच्या आयुष्याशी कसा खेळ होतो याचा वाईट अनुभव आल्यानं या डॉक्टर महिलेला धक्काच बसलाय. त्यांनी 'झी २४ तास'समोर नाव उघड न करण्याच्या अटीवर आपल्यावर ओढावलेला जो प्रसंग कथन केला तो धक्कादायक आहे.

कर्करोग नसताना...

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पोटात दुखू लागल्यानं त्यांनी वेगवेगळ्या चाचण्या केल्या. तरीही बरं वाटत नसल्यानं त्यांना 'बायोप्सी' करण्याचा सल्ला देण्यात आला. नाशिकमधल्या रेलिगेअर लॅबमध्ये त्यांनी चाचण्या केल्या, तेव्हा त्यांना कर्करोग झाल्याचं निदान रेलिगेअरनं केलं. पोटात गर्भ असताना त्यांनी दोन वेळा केमोथेरपीही घेतली. होणाऱ्या बाळाबाबत अधिक सल्ला घेण्यासाठी त्यांनी मुंबईला टाटा कर्करोग रुग्णालय गाठलं... टाटाच्या डॉक्टरांनी पुन्हा बायोप्सीचा सल्ला दिला. मात्र, त्या तपासणीत कर्करोग झालेलाच नाही, असं निदान झाल्यानं त्यांना धक्काच बसला. आणखी खातरजमा करण्यासाठी त्यांनी रहेजा रुग्णालयात बायोप्सी केली. तिथंही त्यांना कर्करोग झालेला नाही, यावर शिक्कामोर्तब झालं.

पॅथॉलॉजी लॅबविरोधात तक्रार दाखल

कर्करोग झालेला नसतानाही तसं निदान करणाऱ्या रेलिगेअर पॅथॉलॉजी लॅबविरुद्ध पीडित महिला डॉक्टरनं ग्राहक न्यायालयात तक्रार केली. या तक्रारीत पॅथॉलॉजी लॅबचा भोंगळ कारभार समोर आल्यानंतर न्यायालयानं रेलिगेअरला सात लाख रुपयांचा दंड ठोठावला.

डॉक्टर असलेल्या महिलेच्या बाबतीत हे घडलं... राज्यात अशाप्रकारे चुकीच्या रोग निदानामुळं किती रुग्णांना त्रास सोसावा लागत असेल, याची गणतीच नाही... वैद्यकीय व्यवसायाचं किती अधःपतन होतंय, हेच यातून स्पष्ट होतंय.