सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे नाराज नेते दळवींची घेतली भेट

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.  सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे नाराज माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची घरी जाऊन भेट घेतली.

Updated: Jan 5, 2019, 09:48 PM IST
सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे नाराज नेते दळवींची घेतली भेट title=
राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी, राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आणि आगामी लोकसभा निडणुकीचे संभाव्य उमेदवार सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे नाराज माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची घरी जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सूर्यकांत दळवी आणि शिवसेना नेते पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दळवी यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दळवी यांना डावले गेल्याने ते खूप नाराज आहेत. दळवी - कदम मोठा वाद निर्माण झाला आहे. दोघांना एकमेकांवर तोंडसुख घेतले आहे. दळवी नाराज असल्याने त्यांची तटकरे यांनी भेट घेवून राजकीय गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे. 

दुसरीकडे पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यात विस्तव देखील जात नाही. त्यातच काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांनी सूर्यकांत दळवी यांच्यावर टीका देखील केली. त्यामुळे सूर्यकांत दळवी नाराज आहेत. त्याचाच फायदा घेत सुनील तटकरे यांनी सूर्यकांत दळवी यांनी भेट घेतल्याचं बोलले जात आहे. या भेटीनंतर हे दोघेही दापोलीतील एका कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे तटकरे- दळवी भेटीने सध्या राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

रामदास कदम यांनी आपल्या मुलासाठी विधानसभेसाठी तयारी सुरु केल्याचे बोलले जात आहे. दापोली-मंडणगड विधानसभा मतदार संघातून मुलाला उमेदवारीसाठी रामदास कदम यांनी जोरदार प्रयत्न सुरु केलेत. तसेच दळवी याआधी दापोलीचे आमदार राहिले आहेत. मात्र, यावेळी संजय कदम हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत. आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दळवी इच्छुक आहेत. मात्र कदम यांनी जोर लावल्याने आणि त्यांच्यावर सातत्याने टीका केल्याने  दळवी कमालीचे नाराज आहेत. त्यामुळे या संधीचा फायदा राष्ट्रवादीने घेण्याचा प्रयत्न केल्याची कुजबूज सुरु झाली आहे. जर राष्ट्रवादीच्या गळाला दळवी लागले तर येथील राजकीय गणिते बदलून त्याचा तोटा हा शिवसेनेला बसेल आणि राष्ट्रवादीचा पाया अधिक मजबूत होईल, अशी चर्चा आहे.