कणकवलीत हायव्होल्टेज ड्रामा! नारायण राणे यांच्या घरावर पोलिसांनी चिकटवली नोटीस

नारायण राणे यांच्या घरातील कर्मचाऱ्याने नोटीस काढून टाकली

Updated: Dec 29, 2021, 04:11 PM IST
कणकवलीत हायव्होल्टेज ड्रामा! नारायण राणे यांच्या घरावर पोलिसांनी चिकटवली नोटीस title=

सिंधुदुर्ग : Nitesh Rane Case : कणकवलीत सध्या हायव्होल्टेज ड्रामा पाहिला मिळत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना कणकवली पोलिसांकडून (kankavli police) चौकशीला हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. नितेश राणे हे नॉट रिचेबल असल्याने पोलिसांनी आता नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली. 

नोटीसनुसार आज दुपारी 3 वाजता नारायण राणे यांना पोलीस स्टेशनला हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. सीआरपीसी कलम 160 (1) अन्वये नोटीस पाठवण्यात आली. पण तीन वाजून गेल्यानंतरही नारायण राणे कणकवली पोलीस स्थानकात हजर झाले नाहीत. 

अर्धा तास वाट पाहिल्यानंतर कणकवली पोलिसांनी नारायण राणे यांच्या बंगल्यावर नोटीस चिकटवली आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांच्याबद्दल माहिती देण्याबाबत नोटिशीत उल्लेख करण्यात आलेला आहे. 

संतोष परब हल्ला प्रकरणात सिंधुदुर्ग पोलीस नितेश राणेंचा शोध घेत आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून नितेश राणे अज्ञातस्थळी आहेत. तसेच नितेश राणे नॉटरिचेबल आहेत. त्यांची माहिती मिळवण्यासाठी नारायण राणे यांना पोलीसांची नोटीस बजावण्या आली आहे. 

दरम्यान, नाराणय राणे यांच्या घरावर पोलिसांनी लावलेली नोटीस घरातील कर्मचाऱ्याने काढून टाकली. 

नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे कुठे आहेत? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आमदार नितेश राणे कुठे आहेत ते सांगायला मला मूर्ख समजला का? असा सवाल उपस्थित केला होता. त्या अनुषंगानेच कणकवली पोलिसांनी ही नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे समजत आहे.

काय आहे नोटीशीत

गुन्ह्याचे तपासकामी कणकवली पोलीस ठाणे येथे हजर राहणेबाबत.

आपणास या नोटीसीद्वारे सुचित करण्यात येते की, कणकवली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नं.३८७/२०२१ भा.द.वि.कलम ३०७,१२० (ब), ३४ या गुन्ह्यात श्री. नितेश नारायण राणे हे पाहीजे आरोपी असून त्यांचा ठावठिकाणा अथक प्रयत्न करुन सुद्धा मिळुन येत नाही व सदर आरोपीचा शोध जारी आहे.

आपण काल दि. २८.१२.२०२१ रोजी पत्रकार परीषद घेतली होती. सदर गुन्हयाबाबत आक्षेपार्ह विधाने केली होती. तसेच एका पत्रकाराने आपणास पाहीजे आरोपी श्री. नितेश राणे यांच्या ठाव ठिकाणाबद्दल प्रश्न विचारला असता आपण श्री. नितेश राणे हे कोठे आहेत ते सांगायला आम्ही मुर्ख आहोत का? असे विधान केले. तसेच सदरील बाबतीत आज दि.२९.१२.२०२१ रोजी रत्नागिरी टाईम्स आणी इतर वृत्तपत्रातुन आपले सदर विधान प्रसिद्ध झाले आहे.

वरील सर्व बाबींचा सर्वकष विचार करता असे दिसते की, श्री. नितेश राणे या आरोपीचा ठाव ठिकाणा आपणास पुर्णपणे माहीती आहे.

तरी सदरील नोटीस मिळताच आपण पाहीजे आरोपी श्री. नितेश राणे यास आमचे समोर हजर करावे. तसेच आपल्या पत्रकार परीषदेनुसार आपल्याला माहीती असलेल्या गुन्हयाच्या तपशिलाबाबत जबाब नोंदविण्यासाठी दि. २९.१२.२०२१ रोजी १५.०० वाजता कणकवली पोलीस ठाणे येथे आमचे समोर स्वतः हजर रहावे.