'मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला विरोध कराल तर ओबीसींचं आरक्षणही...' मनोज जरांगेंचा इशारा

Maratha vs OBC Reservation : मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर मनोज जरांगे पाटील  किल्ले रायगडावर पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडावरुन जरांगे पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला. यावेळी त्यांनी गंभीर इशारा दिलाय.

राजीव कासले | Updated: Jan 30, 2024, 02:52 PM IST
'मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला विरोध कराल तर ओबीसींचं आरक्षणही...' मनोज जरांगेंचा इशारा title=

Maratha vs OBC Reservation : मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाल विरोध करत असाल तर ओबीसींचं 27% आरक्षण रद्द करणार असा मोठा इशारा मनोज जरांगें पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिलाय. मंडल आयोग आम्ही स्वीकारलेला नाही. मात्र मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं करत असाल तर मग त्यालाही आव्हान देण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) जर मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) आव्हान देत असतील तर आम्हीही ओबीसींना आव्हान देऊ असा जाहीर इशारा जरांगेंनी दिलाय. तर मराठ्यांचं कल्याण होत असताना शंका घेण्याचं कारण काय असा सवाल जरांगे पाटलांनी विचारलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मुंबईत बंद घरांचं सर्व्हेक्षण केलं का असा सवाल केला होता. त्यावर जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय.

मनोज जरांगेंची घोषणा
मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर जरांगेंनी आज आणखी एका आरक्षणाच्या लढ्याची घोषणा केलीय.. येत्या काळात धनगर आणि मुस्लिम आरक्षणासाठी काम करणार असल्याची घोषणा जरांगेंनी केलीय.. धनगर आणि मुस्लिम आरक्षणासाठी जरांगेंनी आता रणशिंग फुकलंय.. रायगडावरुन जरांगेनी ही घोषणा केलीय..

सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीने सुरु असल्याचा आरोप
मराठ्यांना कुणबी दाखले देण्यासंदर्भातल्या जीआरचा मसुदा तयार करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आमच्या चर्चा केली नसल्याचा आरोप ओबीसी नेते आणि अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळांनी केलाय. तसंच मराठा समाजाचं सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीनं सुरू असल्याचा आरोपही भुजबळांनी केलाय. तर भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याचं कॅबिनेटमध्ये ऐकलं जात नसेल, तर हा त्यांचा अपमान आहे, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. कॅबिनेटमध्ये गँगवॉर सुरू आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलीय.

आतापर्यंत किती टक्के सर्वेक्षण
मराठवाड्यात आतापर्यंत 62 टक्के इतकंच मराठा सर्वेक्षणाचं काम पूर्ण झालंय... 31 जानेवारी ही सर्वेक्षणासाठीची डेडलाईन आहे.. तेव्हा आज आणि उद्या मराठवाड्यातलं उर्वरित 38 टक्के सर्वेक्षण कसं पूर्ण करणार हा मोठा प्रश्न आहे.. मराठवाड्यात आतापर्यंत 30 लाख कुटुंबांचं सर्वेक्षण झालंय. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 84 टक्के सर्वेक्षण पूर्ण झालंय. तर छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव जिल्ह्यांत 50 ते 55 टक्के काम पूर्ण झालंय. विशेष म्हणजे जरांगेंचं मराठा आंदोलन मराठवाड्यातल्या मराठा बांधवांसाठीच सुरुवातीला सुरु झालं होतं.. त्याच मराठवाड्यात मात्र 62 टक्केच सर्वेक्षण झाल्यानं मराठा आरक्षण कसं मिळणार असा मोठा प्रश्न आहे.. 

राज्यभरात शिक्षकांच्या मदतीने मराठा सर्वेक्षण करण्यात येत आहे...मात्र, भंडा-यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय...गोंडेगाव येथे शाळेच्या वेळेत शिक्षक सर्वेक्षणाचं काम करताना दिसत आहेतच, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनाही सोबत घेऊन फिरत आहेत...याबाबत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीये...तर भंडारा जिल्हा परिषद शिक्षण सभापतींनी तर अजबच युक्तिवाद केलाय...सरकारनेच शिक्षकांना सर्व कामं सोडून सर्वेक्षण करायला सांगितल्याचं ते म्हणाले...तर विद्यार्थ्यांना सर्वेक्षणासाठी घेऊन फिरणा-या शिक्षकांवर चौकशी करून कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं..