रखरखत्या उन्हात उघड्या अंगानं सापडली 'नकोशी', उपचारा दरम्यान मृत्यू

धक्कादायक म्हणजे, आठवड्याभरातील ही दुसरी घटना आहे

Updated: Mar 13, 2019, 12:06 PM IST
रखरखत्या उन्हात उघड्या अंगानं सापडली 'नकोशी', उपचारा दरम्यान मृत्यू title=
प्रतिकात्मक फोटो

परभणी : परभणी जिल्ह्यात हृदय पिळवटून टाकणारी पण तितकीच चिंतणीय घटना समोर आलीय. परभणीतील ताडकळस भागातील झाडगाव परिसरात रस्त्याच्या कडेला फेकून दिलेलं एक स्त्री अर्भक सापडलं होतं. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना आज या 'नकोशी'चा मृत्यू झालाय. सोमवारी स्थानिक पोलिसांनी सोमवारी या अर्भकाला रुग्णालयात दाखल केलं होतं. 

धक्कादायक म्हणजे, रस्त्यावर सापडलेल्या या बाळाच्या अंगावर एकही कपडा नव्हता... रखरखत्या उन्हात उघड्या अंगानं निर्दयी माता-पित्यानं त्याला रस्त्यावर टाकलं होतं. या बाळाचा आवाज ऐकल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला पाहिलं... परंतु, धक्कादायक म्हणजे यापैंकी कुणीही या बाळाला उपचारासाठी हलवलं नाही.

ग्रामस्थांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या बाळाला जवळच्या स्थानिक शासकीय रुग्णालयात हलवलं. रुग्णालयात दाखल केलेल्या या बाळावर उपचार सुरू असताना ते कमी वजनाचं असल्याचं लक्षात आलं... जन्मता:च हेटाळणी मिळालेल्या या अर्भकाचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला आहे. 

धक्कादायक म्हणजे, आठवड्याभरातील ही दुसरी घटना आहे. याअगोदर महिला दिनी अर्थात ८ मार्च रोजी गुळखंड फाटा इथंही एक स्त्री जातीचं अर्भक सापडलं होतं. पोलीस या अर्भकांच्या निर्दयी माता-पित्यांचा शोध घेत आहेत.