'मोदींनी तरी अंबानींना सांगायला हवं होतं की बाबा, तुझी कंपनी...'; मनसेचा टोला

MNS Slams Ambani Referring PM Modi Was On Stage: रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अबांनींनी बुधवारी गुजरातमधील गांधीनगरमध्ये झालेल्या कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 11, 2024, 02:25 PM IST
'मोदींनी तरी अंबानींना सांगायला हवं होतं की बाबा, तुझी कंपनी...'; मनसेचा टोला title=
प्रसारमाध्यमांशी बोलताना मनसे नेत्यानं मांडली मतं

MNS Slams Ambani Referring PM Modi Was On Stage: गुजरातमधील गांधीनगरमध्ये बुधवारी पार पडलेल्या व्हायब्रंट गुजरातच्या कार्यक्रमादरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी केलेल्या एका विधानावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत आक्षेप नोंदवला आहे. व्हायब्रंट गुजरात परिषदेमध्ये बोलताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी रिलायन्स कंपनी ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील असं म्हटलं. तसेच मागील 10 वर्षात रिलायन्सने केलेल्या गुंतवणुकीपैकी एका तृतियांश गुंतवणूक एकट्या गुजरातमध्येच केल्याचंही आशियामधील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अंबानी यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरच अंबानींनी हे विधान केल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यावर आक्षेप घेतला आहे. 

पंतप्रधान पण गुजरातचे आहेत की...

मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी या भाषणावरुन आक्षेप घेताना देशाचे पंतप्रधान बाजूला असताना मुकेश अंबानींनी असं विधान केल्याचं आपल्याला आश्चर्य वाटत असल्याचं म्हटलं आहे. "मला आश्चर्य हे वाटतं की सन्माननिय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी बाजूला उभे होते. त्यांनी तरी निदान सांगायला हवं होतं की 'अरे बाबा, तुझी कंपनी भारतीय कंपनी आहे. गुजरातची नाही. आता पंतप्रधान पण गुजरातचे आहेत की देशाचे आहेत ही पण विचार करण्याची गोष्ट आहे," असा टोला संदीप देशपांडेंनी लगावला. 

मुकेश अंबानी संकुचित नाही का?

पुढे बोलताना संदीप देशपांडेंनी, "मुळात मुद्दा असा आहे की, याच गोष्टी राज ठाकरे, मनसे म्हणतात. आम्ही मराठी भाषेबद्दल बोलतो तेव्हा संपूर्ण देश आम्हाला संकुचित ठरवतो. हे फक्त महाराष्ट्राबद्दल विचार करतात, हे फक्त मराठी माणसाबद्दल विचार करतात हे फार संकुचित आहेत असं म्हणतात. मग मुकेश अंबानी संकुचित नाही का? नरेंद्रभाई मोदी फक्त गुजरातबद्दल विचार करत असतील तर ते संकुचित नाहीत का?" असा प्रश्न 

मराठी माणसाचं महत्त्वं कमी करण्याचा प्रयत्न

रिलायन्सबरोबर काही पत्र व्यवहार करणार आहात का? असं देशपांडेंना विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना देशपांडेंनी, "मराठी माणसाने जागृक होण्याची गरज आहे. ज्या पद्धतीचं आक्रमण तुम्ही करायला लागला आहात, मराठी माणसाचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करायला लागला आहात याबद्दल मराठी माणसाने याबद्दल जागृक राहिलं पाहिजे. राज ठाकरेंनी पण हेच सांगितलं की मराठी माणसाच्या जामीनी जात आहेत आणि तिथे उद्योग गुजरात्यांचे होत आहेत. तिथे रोजगारपण मराठी माणसाला मिळत नाही," असं म्हटलं.

नक्की वाचा >> अंबानी विरुद्ध मनसे: 'मराठी माणसाने यापुढे रिलायन्सचं प्रोडक्ट घेताना..'; थेट इशाराच

मुकेश अंबानी नेमकं काय म्हणाले?

गांधीनगरमधील कार्यक्रमात बोलताना "मी गेट वे ऑफ इंडिया असलेल्या शहरामधून मॉर्डन इंडियाचं गेट वे असलेल्या गुजरातमध्ये आलो आहे. मी स्वाभिमानी गुजराती आहे," असं म्हणत भाषणाला सुरुवात केली. "परदेशी लोक जेव्हा नव्या भारताचा विचार करतात तेव्हा ते नव्या गुजरातचा विचार करतात. हा बदल कसा घडला? हा एका नेत्यामुळे घेडलेला आहे. ते आज आपल्या काळातील जगातील आघाडीचे नेते आहेत. ते नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. भारताच्या इतिसाहातील ते सर्वात यशस्वी नेते आहेत," असं मुकेश अंबानींनी व्हायब्रंट गुजरातच्या मंचावरुन भाषणादरम्यान म्हटलं.

एक तृतियांशहून अधिक पैसा गुजरातमध्ये गुंतवला

पुढे बोलताना मुकेश अंबानींनी, "रिलायन्स ही सुरुवातीपासूनच गुजराती कंपनी होती, आहे आणि पुढेही राहील. रिलायन्सने 150 बिलियन डॉलर्स म्हणजेच 12 लाख कोटी रुपये मागील 10 वर्षांमध्ये जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा आणि सेवा उभारण्यासाठी गुंतवले आहेत. यापैकी एक तृतियांशहून अधिक पैसा हा एकट्या गुजरातमध्ये गुंतवला आहे," असंही मुकेश अंबानी म्हणाले.