कोविड होऊन गेलेल्यांना दिवाळीदरम्यान श्वसन विकाराचा धोका दुप्पट; फटाक्यांपासून दूर राहा!

Nagpur Pollution : मुंबई पुणे प्रमाणेच नागपुरातही प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशातच दिवाळीनंतर अजून मोठ्या प्रमाणात श्वसनविकारांच्या रुग्णांमध्ये वाढ होईल, अशी चिंता श्वसनरोगतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

अमर काणे | Updated: Nov 9, 2023, 08:28 AM IST
कोविड होऊन गेलेल्यांना दिवाळीदरम्यान श्वसन विकाराचा धोका दुप्पट; फटाक्यांपासून दूर राहा! title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : मुंबई आणि पुणे येथे प्रदूषणामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. राज्याची उपराजधानी नागपूरतही दिवाळीपूर्वीच प्रदूषणामुळे श्वसन विकारांच्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे डॉक्टर सांगताय. श्वसन विकरांच्या रुग्णांना सामान्यांच्या तुलनेत धोकाही दुप्पट झालाय. दिवाळी आणि थंडी हा दुहेरी आनंदाचा क्षण आहे. मात्र वातावरणातील बदल, वाढणारी थंडी अशावेळी वाढणारे ओझोनचे प्रमाण, त्यात दिवाळीत फटाके व अन्य वायू प्रदूषण अशा श्वसनरोगास कारणीभूत ट्रिगरमुळे अस्थमा, सीओपीडी व अन्य फुफ्फुस विकारांच्या रुग्णांना दुप्पट धोका निर्माण झालाय. या दरम्यान योग्य काळजी घेतली नाही, तर दिवाळीनंतर अजून मोठ्या प्रमाणात श्वसनविकारांच्या रुग्णांमध्ये वाढ होईल, अशी चिंता श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी व्यक्त केलिय .

एरवी प्रदूषण म्हटलं की, बाहेरील प्रदूषण एवढ्यापुरते मर्यादित असतं असा आपला समज असतो. मात्र, घराअंतर्गत प्रदूषण जे दिवाळीची स्वच्छता, रंगरंगोटी, अगरबत्ती व घरात जाळायचे फटाके यामुळे होते या बाबींकडेही लक्ष्य द्यायला हवं. या प्रदूषणामुळे सर्दी-खोकला व दम्याचा त्रास असेल तर त्यात वाढ होते. पूर्वापार दमा व श्वसनविकार असलेल्यांनी या दुर्लक्षित प्रदूषणाची जाणीव ठेवून विशेष काळजी घेतली पाहिजे. याशिवाय वातावरणातील प्रदूषण हे सातत्याने वाढत आहे. 

कारखाने व इंडस्ट्रीज्, मोठी मोठी बांधकामं यामुळे धुली कणांचे प्रदूषण वाढत चाललं आहे. फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी हे हानिकारक आहे. दिवाळीच्या फटाक्यांमुळे होणार्‍या वायुप्रदुषणाचा त्रासही अनेकदा होऊ शकतो. दिवाळीच्या फटाक्यांमुळे त्वचेला आणि कानांना त्रास होतो. यासोबतच घसा खवखवणे, डोळ्यात पाणी येणे कानात बधिरता येणे, अंगावर खाज येणे अशी लक्षणे देखील उद्भवू शकतात. फटाक्यांमधून निघणार्‍या धुरात सल्फरडाय ऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड आणि अन्य विषारी रसायने असतात. त्यामुळे सर्दी-खोकला, दमा, सीओपीडी, इंटरस्टेशियल लंग्स डिसिज, ज्यांना कोविड होऊन गेलाय असे रुग्ण, कोविड फायब्रोसिसचे रुग्ण, अशा फुफ्फुसाची व श्वासांशी संबंधीत रुग्णांना या धुराचा त्रास होतो. त्यामुळे त्यांनी तर जाणीवपूर्वक या धुरापासून दूर राहिले पाहिजे. एकूणच सीओपीडी आणि दमाच्या रुग्णांनी घरातील धुळ आणि फटाक्यांचा धूर यापासून दूर रहाण्यास प्राधान्य दिले पाहिजे.

पावसाळा संपून वातावरणात गारठा निर्माण झाला असला, तरी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे वातावरणात ओझोन वायुचा स्तर वाढतो. त्यामुळे डोळ्यात जळजळ, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसतात. त्याचे रुपांतर सर्दी-खोकला-ताप यामध्ये होते. सामान्यांसह श्वसनविकारांच्या रुग्णांना यामुळे त्रास होतो व विकार वाढतात. सोबतच वातावरणातील स्मॉग (प्रदुषणयुक्त धुके) हे देखील श्वसनविकारांसाठी कारणीभूत ठरत आहे.

श्वसनासंबंधी आजार बळावतात

जेव्हा ऋतू बदलतो, तेव्हा आपल्या शरीराला त्या वातावरणाशी समरस होण्यास वेळ लागतो. त्या वेळेसही श्वसनाशी संबंधीत आजार बळावतात. दम्यासह व्हायरल फिवर, ताप, अंगदुखी, सर्दी यांचेही प्रमाण वाढते. लहान मुलांवर व ज्येष्ठ नागरिकांवर त्याचा अधिक परिणाम होतो.