सराव करताना पिस्तूलमधून गोळी सुटली, आईच्या जबड्यात घुसली

गोळी चालविण्याचा सराव करताना मुलाकडून पिस्तूलमधून अचानक गोळी सुटली आणि ही गोळी थेट आईच्या जबड्यात घुसली.  

Updated: Jun 1, 2019, 05:41 PM IST
सराव करताना पिस्तूलमधून गोळी सुटली, आईच्या जबड्यात घुसली title=

सातारा : दुसऱ्याचा काटा काढण्यासाठी पिस्तूल आणले होते. दरम्यान, गोळी चालविण्याचा सराव करताना मुलाकडून पिस्तूलमधून अचानक गोळी सुटली आणि ही गोळी थेट आईच्या जबड्यात घुसली. जखमी आईला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता धक्कादायक प्रकार पुढे आला. घरगुती कारणातून वाद निर्माण झाल्याने नातेवाईकांचा काटा या मुलाला काढायचा होता. त्यासाठी त्यांनी बेकायदेशीररित्या पिस्तूल विकत घेतले होते. 

खटाव तालुक्यातील पळसगाव येथील संगिता फडतरे या पिस्तूलमधून उडालेल्या गोळीने जखमी झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यांचा मुलगा अभिषेक फडतरे याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी त्याने माळ्यावर साफसफाई करत असताना आईने बॅगेतून पिस्तूल बाहेर काढले. तेव्हा चुकून गोळी सुटून आई जखमी झाली, अशी माहिती त्याने दिली. पोलिसांनी त्याच्या आईकडे चौकशी केली. त्यावेळी तिनेही मुलगा सांगत असलेली कहाणी सांगितली. मात्र, पोलिसांना दोघांच्या बोलण्यातील काही विसंगती आढळली. पोलिसांना संशय आला. पोलिसांनी अभिषेक फडतरेकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने या घडलेल्या घटनेची खरी माहिती पोलिसांना दिली.

अभिषेक हा उच्च शिक्षित असून पुणे येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत होता. त्यावेळी त्याने पुण्यातील मित्राच्या मदतीने धुळे शिरपूर येथून ५० हजार रुपयांना पिस्तूल विकत घेतले. अभिषेकच्या कुटुंबीयांचे पूर्वीपासून जवळच्या नातेवाईकासोबत जमिनीचे आणि घरगुती कारणातून वाद आहेत. त्यामुळे संबंधित नातेवाईकाचा काटा काढण्यासाठी त्याने टोकाचे पाऊल उचलून पिस्तूल विकत घेतले होते, अशी माहिती पोलीस उपअधिक्षक धीरज पाटील यांनी दिली. 

तो गोळी चालवण्याचा सराव घरातच करत होता. सराव करत असताना पिस्तूलातून गोळी झाडल्यानंतर अचानक आईमध्ये आली. त्याने झाडलेली गोळी आईच्या जबड्यातून आरपार गेली. या प्रकरणी अभिषेक फडतरेला अटक करण्यात आली आहे, असे पोलीस उपअधिक्षक धीरज पाटील यांनी सांगितले.