पुणेकरांना अशीही 'शिक्षा', आता पुण्यात महागली 'रिक्षा'

पेट्रोल डिझेल आणि वाढत्या GST पाठोपाठ महागाईच्या तीव्र झळा आता बसत आहेत. पगारवाढ सोडा पण खिशाला लागणारी कात्री वाढतच चालली आहे. 18 जुलैपासून जीवनावश्यक वस्तूंवरील GST वाढला. त्यानंतर पुण्यात CNG चे दर वाढले आणि त्यापाठोपाठ आता रिक्षाप्रवासही महागला आहे. 

Updated: Jul 25, 2022, 06:08 PM IST
पुणेकरांना अशीही 'शिक्षा', आता पुण्यात महागली 'रिक्षा' title=

सागर आव्हाड, झी 24 तास पुणे : पेट्रोल डिझेल आणि वाढत्या GST पाठोपाठ महागाईच्या तीव्र झळा आता बसत आहेत. पगारवाढ सोडा पण खिशाला लागणारी कात्री वाढतच चालली आहे. 18 जुलैपासून जीवनावश्यक वस्तूंवरील GST वाढला. त्यानंतर पुण्यात CNG चे दर वाढले आणि त्यापाठोपाठ आता रिक्षाप्रवासही महागला आहे. 

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड, बारामतीमध्ये रिक्षाची भाडेवाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका बसणार आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांच्या संयुक्त बैठकीत हा मोठा निर्णय झाला. 

सर्वसामान्य नागरिकांचा रिक्षा प्रवास 2 रुपयांनी महागला आहे. त्यामुळे आता तुम्ही जेवढ्या पैशांनी प्रवास करता त्यापेक्षा 2 रुपये तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. नवी भाडेवाढ 1 ऑगस्टपासून लागू होणार आहे.  भाडेवाढीमुळे पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. 

दुसरीकडे डोंबिवली परिसरात काही रिक्षा चालकांनी आपली मनमानी करून 2 रुपये जास्त भाडेवाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर मुंबई उपनगरात भाडेवाढ होणार का? याकडे मुंबईकरांचं लक्षं लागलं आहे.