'कुणालाच सोडू नका'; पुण्यात पोलिसांसमोर भररस्त्यात कोयत्याने हाणामारी

Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा कोयता गॅंगची दहशत पाहायला मिळत आहे. वडगाव शेरीमध्ये दोन गटांमध्ये महिला पोलिसांसमोर कोयत्याने हाणामारी सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे.

सागर आव्हाड | Updated: Dec 28, 2023, 10:34 AM IST
'कुणालाच सोडू नका'; पुण्यात पोलिसांसमोर भररस्त्यात कोयत्याने हाणामारी title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात कोयता गॅंगची दहशत अद्यापही कमी होताना दिसत नाहीये. आता तर पोलिसांसमोरच कोयता गॅंग सर्रासपणे भररस्त्यात कोयत्याने मारामारी करत असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याचे समोर आलं आहे. वारंवार कारवाई करुन देखील पुण्यात कोयता गँगची दहशत कायम असल्याचे दिसत आहे. एकीकडे पोलीस आयुक्त रितेश कुमार गुन्हेगारांवर मोक्का कारवाई करत असताना ही गुन्हेगारांचा उच्छाद कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

दोन गटात झालेल्या वादात एका गटाकडून कोयत्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार पु्ण्याच्या वडगाव शेरी भागात घडला आहे. या हाणामारीत तीन तरुण जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार घडला त्यावेळी एक महिला पोलीस तिथेच उपस्थित होती. आरोपी तरुण महिला पोलिसांसमोर पीडित तरुणांवर कोयत्याने वार करत होते. तसेच दगडाने मारहाण करत होते. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. 

वाद मिटवण्यासाठी गेलेले असता मित्राला कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केलाप्रकरणी पाच आरोपींविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव शेरीतील आनंद पार्कच्या पवन सुपर मार्केटजवळील दिगंबर नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. सौरभ संतोष पाडळे (रा. सोमनाथ नगर, वडगावशेरी) यांनी अनुज जितेंद्र यादव, ऋषिकेश टुनटुन चव्हाण (वय 18), आकाश भरत पवार (वय 23), अमोल वसंत घोरपडे (वय 30), अक्षय तापकीर, राहुल बारसे यांच्याविरुद्ध चंदन नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यापैकी अनुज, ऋषिकेश आणि आकाश हे तिघे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यासह चोरपडे यांना अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ पाडळे याचा मित्र ऋषिकेश ढोरे याचा आरोपी आकाश पवार याच्याशी वाद झाला होता. या वादात पाडळे ढोरे यांच्यासोबत होता. त्याचवेळी आकाशने पाडळे याच्यावर वार केले. त्यानंतर अनुजने ढोरे याच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमा करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना जोरात शिवीगाळ करून कोणालाही सोडू नका, असे म्हणत तिथे पडलेल्या दगड व विटांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान पाडळे यााचा मित्र अभि आगरकर व योगेश ढोरे यांना वाचवण्यासाठी गेले असता त्यांनाही कोयत्याने वार करून जखमी केले. यानंतर, त्यांनी कोयता हवेत नाचवला आणि जो कोणी त्यांना थांबवेल त्याला ठार मारण्याची धमकी दिली, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

उरुळी कांचनमध्ये शाळेच्या गेटबाहेरच दोन गटांत तुफान राडा

दरम्यान, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील एका शाळेच्या गेटबाहेर दोन अल्पवयीन गटातील 20 ते 25 जणांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली. स्वामी विवेकानंद अकॅडमी शाळेच्या गेटसमोर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.  बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास स्वामी विवेकानंद अकॅडमी या शाळेच्या गेटसमोर पांढरस्थळ परिसराकडे जाणाऱ्या दोन अल्पवयीन गटांमध्ये अचानक मारामारी सुरु झाली.