Pune Porshce Accident : विशाल अग्रवालसह तिघांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी

Pune Porshce Accident : पुण्यातील कल्याणीनगरमधील पॉर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालला आज कोर्टात हजर करण्यता आलं. कोर्टाने त्याला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशाल अग्रवालबरोबरच आणखी दोघांनाही 24 मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. 

राजीव कासले | Updated: May 22, 2024, 04:40 PM IST
Pune Porshce Accident : विशाल अग्रवालसह तिघांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी title=

Pune Porshce Accident : पुण्यातील कल्याणीनगरमधील पॉर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालला (Vishal Agrawal) आज कोर्टात हजर करण्यता आलं. कोर्टाने त्याला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. विशाल अग्रवालबरोबरच आणखी दोघांनाही 24 मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. यात ब्लॅक पबचे कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश बोनकर यांचा समावेश आहे. या तिघांनाही आज पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं. नीतेश शेवानी याने अल्पवयीन मुलाला पब मध्ये प्रवेश दिला आणि जयेश बोनकर याने मद्य सर्व्ह केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

सरकारी वकिलांचा युक्तीवाद
कोर्टात सरकारी वकील यांनी बाजू मांडताना मुलाला पबमध्ये जाण्यास संमती देण्यात आली आणि ड्रायव्हिंग लायसन्स नसताना गाडी दिली याबद्दल अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालला अटक केल्याचं सांगितलं. मुलाला जी गाडी दिली ती विना नंबर प्लेटची होती, मुलाला किती पैसे आणि डेबिट कार्ड दिलं होतं, याची माहिती घ्यायची आहे तसंच ब्लॅक पबचे कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश बोनकर यांनी कोणाच्या मेंबरशिप ने अल्पवयीन तरुणाला पबमध्ये प्रवेश दिला याचीही माहिती घ्यायची असल्याचं सांगितले.

विशाल अगरवाल यांनी विना नंबर प्लेट गाडी का चालवायला दिली? वडिलांनी मुलाला पब मध्ये जाण्याची का संमती दिली? मुलाला खर्च करण्यासाठी पॉकिट मनी कुठल्या स्वरूपात दिला?  गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल अगरवाल हे फरार का झाले? ते जेव्हा संभाजी नगर मध्ये आढळून आले तेव्हा त्यांच्याकडे एक साधा मोबाईल मिळून आला बाकीचे त्यांचे मोबाईल कुठे आहेत? असे सवालही सरकारी वकिलांनी उपस्थित केले.  या सर्व प्रश्नांची माहिती मिळवण्यासाठी सरकारी वकिलांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.

विशाल अग्रवाल यांच्या वकिलांचा युक्तीवाद
यावर विशाल अग्रवाल यांच्या वकिलांनी युक्तीवाद करत आरोपी फरार नव्हता, त्याला 41अची नोटीस दिलेली नव्हती, त्यामुळे आरोपीच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचं त्यांनी सांगितलं. अल्पवयीन तरुणाबरोबर ड्रायव्हर होता, बाहेर असताना मुलावर वडिलांचं नियंत्रण शक्य नाही, त्यामुळे विशाल यांच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचंही वकिलांनी कोर्टात सांगितलं.

कोर्टाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा
त्याआधी पुणे कार अपघात प्रकरणातल्या आरोपींवर कोर्टाबाहेर शाईफेक करण्यात आली. अल्पवयीन तरुणाचे वडील विशाल अग्रवालला कोर्टात हजर करत असताना त्याच्या अंगावर शाई फेकली गेली. वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केली. पुण्यातल्या कार अपघातामध्ये दोघा निष्पापांचा बळी गेला यावरुन वंदे मातरम संघटना आक्रमक झालीय. आरोपी विशाल अग्रवाल याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करा, त्याने मुलाला गाडी चालवायला का दिली? दारु पिऊन गाडी का चालवली असे संतप्त सवालही वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले आहेत.