'आज आबा हवे होते'! आर. आर. आबांच्या कन्येच्या लग्नाला भावनिक किनार

कोण आहेत आर आर पाटील यांचे जावई आनंद थोरात बातमीत वाचा.

Updated: May 2, 2018, 12:34 PM IST
'आज आबा हवे होते'! आर. आर. आबांच्या कन्येच्या लग्नाला भावनिक किनार title=

पुणे : महाराष्ट्रातल्या राजकारणाचा सर्वसामान्य जनतेचा चेहरा असलेले दिवंगत नेते आर.आर.पाटील, यांच्या कन्येचा विवाह मंगळवारी सायंकाळी पुण्यात पार पडला. या सोहळ्याला आज आर.आर.आबा पाहिजे होते, अशी भावनिक किनार होती. या लग्नात आबांच्या पश्चात आबांच्या कन्येला राष्ट्रवादी कुटूंबाची साथ मिळाली, हे दिलासादायक चित्र होतं, प्रामुख्याने पाहुण्याचं स्वागत अजितदादा करत होते, तर सुप्रिया सुळे अक्षता वाटताना दिसत होत्या. अजितदादा आणि सु्प्रिया सुळे आपल्याच कन्येचं लग्न असल्यासारखं सर्वांचं आदरतिथ्य करताना दिसत होते. राजकारणात नातेसंबंधांपेक्षा कार्यकर्ता आणि पक्षाला दिलेलं योगदान याला महत्व असतं यातून दिसून येत होतं. माणूस जग सोडून निघून गेल्यानंतरही ही आपलेपणाची संस्कृती सर्वच पक्षांमध्ये रूजावी अशी सर्वांची भावना यावेळी होती.

आबांच्या पश्चातही पक्षाची साथ

खास करून हा सोहळा यावेळी अशासाठी महत्वाचा आहे की, राष्ट्रवादीचे भक्कम मानले जाणारे बुरूज आज ढासळले नाहीत, तर प्रतिपक्षाच्या आधाराला उभे राहिले आहेत. अशावेळी राष्ट्रवादीसाठी काम करणारा माणूस गेला, म्हणून त्यांचं कुटूंब ढासळू नये, म्हणून राष्ट्रवादीतले नेते त्यांच्यासाठी आधार म्हणून बुरूज बनून उभे राहिले आहेत, असं हे चित्र होतं. 

आबांच्या आई आणि पत्नीला अश्रू अनावर

लग्न सभारंभात आज आर. आर. आबा पाहिजे होते, असं वाटत असताना, आर. आर. पाटील यांच्या आई भागिरथी यांना अश्रू अनावर झाले, त्या पाठोपाठ आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील या देखील भावूक झाल्या, अशावेळी सुप्रिया सुळे या सांत्वनाला पुढे येत, अश्रू पुसत त्या दोघांना आधार दिला. 

हा नुसताच आर. आर. पाटील यांचा मुलीचा विवाह सोहळा राहिला नाही, तर आबांच्या पश्चात राष्ट्रवादीचे बडे नेते, आर आर पाटलांचं कुटुंब म्हणून स्मिता पाटील यांच्या कन्यादानाला उभे राहिल्यासारखे होते.

पुण्यातील लक्ष्मी लॉन्स इथं हा सोहळा पार पडला. हा लग्नसोहळा आनंदाचा क्षण असला, तरी त्याला आबांच्या आठवणींची भावनिक किनार होती. 

कोण आहेत आनंद थोरात?

हा विवाह मगरपट्टा सिटीतील लक्ष्मी लॉन्समध्ये सायंकाळी सात वाजता पार पडला. पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांचे पुतणे आनंद थोरात यांच्याशी स्मिता पाटील यांचा विवाह पार पडला. या लग्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी घेतल्याचं समजतंय.आनंद यांनी परदेशातून शिक्षण पूर्ण केलं असून ते पुण्यात व्यवसाय सांभाळतात.

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्ष स्मिता पाटील यांचा साखरपुडा शनिवारी ९ डिसेंबर २०१७ ला, आनंद थोरात यांच्याशी साखरपुडा, तासगावमधील अंजनी गावात झाला, यानंतर आता लग्न मंगळवारी १ मे २०१८ रोजी पुण्यात पार पडलं, लग्नाला राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.