२५० वर्षे प्राचीन २ लाख किंमतीचा 'देव' चोरला

By Pravin Dabholkar | Last Updated: Sunday, August 13, 2017 - 08:28
२५० वर्षे प्राचीन २ लाख किंमतीचा 'देव' चोरला

कर्जत :  आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून एका बाजुला भाविक मंदिरात देवापुढे गर्दी करतात तर दुसरीकडे काही भामटे देव चोरायलाही कमी करत नाही.  अशीच एक घटना श्रीगोंदे शहराच्या नवीपेठेत समोर आली आहे. तिथे असलेल्या जैन मंदिरातील तीर्थशंकर पाश्वनाथ दिगंबर भगवानाची मुर्ती चोरी करण्यात आली आहे. २५० वर्षापूर्वीची प्राचीन मूर्ती अशी याची ओळख होती. या चोरांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. देवाची मुर्ती चोरणाऱ्या भामट्यांना देवाच्या दरबारी काय शिक्षा मिळणार हे देवचं जाणे अस या घटनेनंतर म्हटले जात आहे. 
 
श्रीगोंदे शहरात दोन जैन मंदिरे आहेत. त्यापैकी एक नवीपेठेतील मंदिर पुरातन आहे. या मंदिरात पाश्र्वनाथाची एक फूट उंचीची पंचधातूची मूर्ती होती. सध्या चातुर्मास असल्याने भाविकांची गर्दी होत असते. तीर्थशंकर पाश्वनाथ दिगंबर भगवानाची सुमारे दोन लाख किंमतीची मूर्ती चोरीला गेल्याने परीसरात एकच खळबळ पसरली आहे.  शनिवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडली.  स्थानिक आणि मंदिर प्रशासनाच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. दरम्यान मूर्ती चोरणारा भामटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे मंदिर प्रशासनातर्फे सांगण्यात आले असून त्या आधारावर पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.
  
 मंदिरातील सकाळच्या वेळेतील फुटेज बारकाईने तपासले जात होते. त्यानुसार सकाळी डॉ. बडजाते साडेनऊ वाजता दर्शनासाठी आल्याचे दिसले. त्यानंतर नऊ वाजून एकावन्नच्या सुमारास एक भामटा आला, त्याने मूर्ती पिशवीत घातली अन् तीन मिनिटांत तो पसार झाला. त्यानंतर डॉ.  बडजाते यांच्या पत्नी दर्शनासाठी आल्या, तेव्हा मूर्ती नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी  लगेच आपल्या समाजबांधवांना कल्पना दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी मंदिरास भेट दिली. पोलीस याप्रकरणाची अधिक चौकशी करीत आहेत.

अज्ञाताविरोधात गुन्हा

 पुजारी चंपालाल सोनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

First Published: Sunday, August 13, 2017 - 08:28
comments powered by Disqus