Maharastra Politics : 'तुमच्या नांग्या ठेचू, ॲम्बुलन्स घोटाळ्यात मोठ्या खेकड्याने...', रोहित पवारांचा थेट इशारा

Maharastra Politics : अँब्युलन्स घोटाळ्यात सरकारमधील बडे नेते आणि अधिकारी सामील असल्याचं आरोप रोहित पवारांनी (Rohit Pawar) केलाय. त्यावेळी त्यांनी सरकारला स्पष्ट शब्दात इशारा देखील दिला आहे.

सौरभ तळेकर | Updated: Apr 8, 2024, 05:11 PM IST
Maharastra Politics : 'तुमच्या नांग्या ठेचू, ॲम्बुलन्स घोटाळ्यात मोठ्या खेकड्याने...', रोहित पवारांचा थेट इशारा title=
Rohit Pawar Maharastra Politics

Rohit Pawar On PETA Files Complaint : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात पत्रकार परिषद घेतली अन् एक जिवंत खेकडा उलटा लटकवून दाखवला. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर तोंडसुख घेतलं. मात्र, आता पत्रकार परिषदेत खेकडा दाखवणं (The Crab At Press Conference) रोहित पवारांना महागात पडलं. या प्रकरणी पेटाने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली असून या संदर्भात ‘पेटा’ने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांना पत्र देखील पाठविलं आहे. त्यावर आता रोहित पवारांनी सरकारला खडेबोले सुनावले आहेत.

काय म्हणाले रोहित पवार?

राज्याच्या आरोग्य विभागाच्या इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा असलेल्या ॲम्बुलन्स घोटाळ्यात ‘मोठ्या खेकड्या’ने नांग्या मारण्यास सुरवात केली असून गेल्या आठवड्यात पुरवठादारामार्फत २८० कोटींचा ॲडव्हान्स काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पत्रकार परिषदेत या घोटाळ्याचं आधीच पोस्टमॉर्टेम केल्याने अधिकाऱ्यांनी ‘आता लगेचच नको’ असं सांगत नकार दिल्याचं कळतंय, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दिवसाढवळ्या डोळ्यादेखत हा घोटाळा होत असताना केवळ मोठे खेकडे सहभागी असल्याने सरकारमधील बडे नेते आणि अधिकारी गप्प असले तरी आम्ही मात्र यात सहभागी सर्व खेकड्यांच्या नांग्या ठेचल्याशिवाय शांत बसणार नाही. अधिकाऱ्यांना विनंती आहे, या घोटाळ्यात भागीदार होऊ नका अन्यथा खूप महागात पडेल. सरकारनेही ही लूट त्वरित थांबवावी अन्यथा जनताही सरकारच्या नांग्या ठेचायला मागं-पुढं पाहणार नाही, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. 

दरम्यान, भर दिवसा राज्याची तिजोरी पोखरणाऱ्यांचं प्रतीक म्हणून पत्रकार परिषदेत खेकडा दाखवल्यामुळे भाजप चांगलाच रक्तबंबाळ झाल्याचं दिसतंय आणि यातूनच त्यांनी माझ्याविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करून आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचंच दर्शन घडवलं, अशी टीका देखील रोहित पवारांनी केली होती. नदीत सोडून दिल्याने उलट खेकड्याचा जीव वाचला, पण तिकडं भाजपची मात्र यामुळं तडफड सुरू झाली. यापुढे मी कायदेशीर उत्तर देईल, असंही रोहित पवार यांनी म्हटलं होतं.