22 लाख बुडाल्याच्या भीतीने उचलले टोकाचे पाऊल; आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्याचा पहिला बळी

मुलीच्या भविष्यासाठी त्यांनी पैसे गोळा केले होते. घोटाळा झालेल्या पतसंस्थेत त्यांच्या 22 लाखांच्या ठेवी होत्या. आता हे पैसे बुडाले या भितीने त्यांनी जीवन संपवले आहे.    

Updated: Jul 15, 2023, 05:00 PM IST
22 लाख बुडाल्याच्या भीतीने उचलले टोकाचे पाऊल; आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्याचा पहिला बळी  title=

Chhatrapati Sambhajinagar Crime News: संभाजी नगरच्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.  आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्यामुळे पहिला बळी गेला आहे. लाडगाव इथल्या रामेश्वर इथर या ठेवीदारानं ठेवी बुडाल्याच्या भीतीनं आत्महत्या केली आहे. आदर्श पतसंस्थेच्या 200 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आणि संचालक अंबादास मानकापे याला पोलिसांनी अटक केली आहे. या घोटाळ्यामुळे पतसंस्थेचे ठेवीदार धास्तावले आहेत. 

पतसंस्थेचे ठेवीदार चिंतेत

संभाजी नगरच्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळ्यामुळे ठेवीदार चिंतेत आहेत.  रामेश्वर इथर यांनी पतसंस्थेत तब्बल 22 लाख रुपयांच्या  ठेवी ठेवल्या होत्या. मुलीचं शिक्षण आणि लग्नासाठी म्हणून ही रक्कम त्यांनी जमा केली होती. पतसंस्थेतील 200 कोटींचा घोटाळा समोर आल्यानं इथर चिंतेत होते. कष्टाची कमाई मिळणार नाही या भीतीनं रामेश्वर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

अटकपूर्व जमिन मिळण्याआधीच  घोटाळ्यातील मुख्य सूत्रधाराला अटक

आदर्श पतसंस्थेच्या 200 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आणि संचालक अंबादास मानकापे याला पोलिसांनी अटक केलीय.अटकपूर्व जमिनीच्या कागदावर सह्या करण्यासाठी संभाजीनगरमध्ये एका ठिकाणी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्यानुसार सापळा रचून मानकापेला बेड्या ठोकल्या आहेत.

कसा झाला घोटाळा?

11 जुलै रोजी  संभाजी नगरच्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा उघडीस आला. या 200 कोटींच्या घोटाळा प्रकरणी अध्यक्ष, संचालक मंडळासह सहा जणांविरुद्ध सिडको ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एक घोटाळा 91 कोटींचा असून दुसरा गुन्हा 101 कोटींचा आहे. सहकार विभागाच्या लेखा परीक्षण अहवालात कर्जप्रकरणात हा सगळा घोटाळा करण्यात आला आहे. मार्च 2019 अखेरीस आलेल्या कर्ज प्रकरणातील अपूर्ण स्थितीतले अर्ज पतसंस्थेने स्विकारले होते. कर्ज देतानाचे सर्व नियमांचे पतसंसंथेने उल्ल्ंघन केले. विनातारण आणि कमी तारण स्विकारुन कर्जाचे वाटप करण्यात आले. वितरीत केलेल्या कर्जास संचालक मंडळ सभेने देखील गंभीर त्रुटीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याचे तपासात उघड झाले आहे.