पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा वादळी ठरण्याची शक्यता

विधिमंडळच्या दोन्ही सभागृहात आज ११ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांच्या चर्चेला सुरुवात होणार आहे. 

Updated: Jul 9, 2018, 08:55 AM IST
पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा वादळी ठरण्याची शक्यता title=

नागपूर: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजला आजपासून (सोमवार, ९ जुलै) सुरुवात होत आहे. शुक्रवारी नागपुरात मुसळधार पावसामुळे दिवसभरासाठी तहकूब झालेले विधिमंडळ कामकाज, व्यवस्थापन, राज्यासमोरचे प्रश्न आदी मुद्द्यांमुळे सोमवारचा दिवस गाजणार आहे.

११ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा

दरम्यान, विधिमंडळच्या दोन्ही सभागृहात आज ११ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांच्या चर्चेला सुरुवात होणार आहे. यानिमित्ताने राज्याचं आर्थिक गणित सांभाळताना नाकीनऊ आलेल्या राज्य सरकारवर हल्लाबोल करण्याची संधी विरोधकांना मिळणार आहे. तर दोन्ही सभागृहात शेतकरी प्रश्नांवर विरोधकांनी चर्चेची मागणी केली आहे.

अधिवेशनात जास्तीत जास्त चर्चा करण्यात येईल - मुख्यमंत्री

या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जास्तीत जास्त चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आगोदरच दिली आहे. तब्बल १८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात बोंडअळीची मदत जमा करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते.  या अधिवेशनात २७ विधेयकं मांडली जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. पण, नैसर्गिक आपत्ती तसेच, सभागृहातील गोंधळामुळे तहकूब करावे लागणारे कामकाज यांमुळे प्रत्यक्षात किती विधेयकं मांडली जातात याबबत उत्सुकता आहे.