आशिर्वाद नाही तर...; अजित पवार गटाने शरद पवारांची दोनदा भेट घेण्यामागील BJP कनेक्शन आलं समोर

Sharad Pawar Ajit Pawar Meet Reason: रविवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बंडखोर मंत्री शरद पवारांना भेटले तर दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांच्या गटाने शरद पवारांची भेट याच ठिकाणी घेतली होती.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 19, 2023, 12:39 PM IST
आशिर्वाद नाही तर...; अजित पवार गटाने शरद पवारांची दोनदा भेट घेण्यामागील BJP कनेक्शन आलं समोर title=
रविवारी आणि सोमवारी अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेली शरद पवारांची भेट

Sharad Pawar Ajit Pawar Meet Reason: राज्यातील राजकारणामध्ये मागील काही आठवड्यांपासून सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडींच्या माध्यमातून विरोधकांची आघाडी मोडण्याचा भारतीय जनता पार्टीचा विचार सुरु होता अशी माहिती समोर आली आहे. विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) दिल्लीतील बैठकीला उपस्थित रहावे असे भाजपाचे प्रयत्न होते. शरद पवार यांना एनडीच्या बैठकीचं अनौपचारिक आमंत्रण होतं. याच आमंत्रणाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल शरद पवारांचं मन वळवण्यासाठी त्यांना भेटले होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्या भेटींमागील खरं कारण आलं समोर

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या महिन्याच्या सुरुवातीला बंडखोरी झाली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. बंडखोर आमदारांमध्ये शरद पवारांचे अनेक विश्वासू सहकाऱ्यांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल यांचाही समावेश आहे. या नाट्यमय घडामोडींनंतर शरद पवारांनी संघर्षाचा इशारा देत आपण या भूमिकेचं समर्थन करणार नाही असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर 16 जुलै रोजी दुपारी अचानक अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि शपथ घेतलेले 9 मंत्री शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पोहोचले होते. या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांचे आशिर्वाद घेण्यासाठी आम्ही आल्याचं सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील सर्व आमदारांनी याच ठिकाणी शरद पवारांची भेट घेतली. ही भेटही आशिर्वाद घेण्यासाठी होती असं सांगण्यात आलं. मात्र आता या भेटींमागील खरं कारण समोर आलं आहे.

शरद पवार एनडीएच्या बैठकीला गेले असते तर...

शरद पवारांना अनौपचारिकरित्या एनडीए बैठकीचं आमंत्रण देण्यात आळं होतं. शरद पवारांना एनडीए बैठकीत आणण्याची जबाबदारी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांवर सोपवण्यात आली होती. रविवारी आणि सोमवारी बंडखोर नेते आणि आमदारांनी पवारांचे मन वळवण्याचे प्रयत्न केले. मात्र या भेटीदरम्यानच्या चर्चेत  शरद पवारांनी एनडीएच्या बैठकीला जाण्यास नकार दिला. शरद पवारांना एनडीच्या बैठकीला आणण्याचा भाजपाचा प्लॅन होता. शरद पवारांनी होकार दिला असता तर विरोधी पक्षांची आघाडी तोडल्याचा संदेश या माध्यमातून दिला जाणार होता, असंही सूत्रांनी सांगितलं.

38 पक्षांची उपस्थिती

दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची बैठक तब्बल 4 तास चालली. यामध्ये एकूण जुने नवे असे 38 पक्ष सहभागी होते. या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल करत घराणेशाहीबरोबरच भ्रष्टाचारी आणि घोटाळेबाजांच्या आघाडीमुळे देशाचे नुकसान होत असल्याचं म्हटलं.