'हिंमत असेल तर मराठ्यांना...', उद्धव ठाकरेंचं PM मोदींना जाहीर आव्हान, गणेशोत्सवात अधिवेशन बोलावल्याने संताप

केंद्र सरकारने ऐन गणेशोत्सवत अधिवेशन  बोलावलं असल्याने उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. हे हिंदूद्वेष्ट सरकार असल्याची टीका त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात  बोलताना केली.   

शिवराज यादव | Updated: Sep 2, 2023, 01:44 PM IST
'हिंमत असेल तर मराठ्यांना...', उद्धव ठाकरेंचं PM मोदींना जाहीर आव्हान, गणेशोत्सवात अधिवेशन बोलावल्याने संताप title=

केंद्र सरकारने ऐन गणेशोत्सवात अधिवेशन बोलावलं असल्याने उद्धव ठाकरे संतापले आहेत. हे हिंदुत्ववादी सरकार असून गणेशोत्सवात अधिवेशन कसं काय लावता? अशी विचारणा त्यांनी केली. तुम्हाला दुसरा मुहूर्त सापडला नाही का? मुहुर्त लावणारे ज्योतिषी कुठून आणले आहेत? अशी विचारणा त्यांनी केंद्र सरकारला केली आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्वस साजरा केला जात असताना नेमकं असं तुमचं काय अडकलं आहे की खास अधिवेशन घेत होतात? असंही उद्धव ठाकरेंनी विचारलं आहे. वांद्रे येथील रंगशारदामध्ये पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. 

"तुम्ही मणिपूरवर बोलायचाच तयार नव्हता. अखेर अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला, पण मणिपूर वगळता इतर गोष्टींवरच भरपूर बोलतात. मग त्यावेळी हे करता आलं नसतं का. पण हिंदुत्तवादी आहात ना...तुम्ही सणांच्या आडवे येणार, पण पितृपक्ष पाळणार. पितृपक्षात अधिवेशन का घेत नाही? हिंदूद्वेष्टा सरकार म्हणून आजही मी त्यांचा निषेधच करतो. पण चला आज मी स्वागत करतो. पण या अधिवेशनात सुप्रीम कोर्टाने जसा दिल्लीतील अधिकारांच्या बाबतीत निर्णय दिला, तेव्हा मनाविरोधात निर्णय दिला म्हणून लोकसभेत पाशवी मतदान करत दिल्लीचा कब्जा मिळवलात. तसंच वटहुकूम काढून मराठा, धनगर यांनी हक्क मिळवून द्या," असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. 

"आम्ही कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही. आपली आघाडी इंडियाच्या नावाने झाली आहे. आता आपल्यावर टीका करणारे इंडियाविरोधी आहेत. त्यांच्या पोटात गोळा उठला आहे," असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. तसंच आज संध्याकाळी जालन्याला जाणार असल्याचं जाहीर केलं. 

"काल जो काही शासकीय अत्याचार झाला, त्याचा निषेध करुन चालणार नाही. सरकार म्हणजे नेमकं कोण? पाहिलं तर एक फूल दोन हाफ आहेत. पण राज्यात आंदोलन सुरु असताना कोणाकडेही वेळ नाही. माता भगिनी उपोषणाला बसल्या आहेत. काल, परवा जेव्हा इंडियाची बैठक सुरु होती, तेव्हा त्यांचे प्रवक्ते आमच्यावर टीका करत होते. यांच्याकडे इंडियाविरोधात बोलायला वेळ आहे. पण आंदोलनकर्त्यांकडे एकाही मंत्र्याला जावंसं वाटलं नाही. आता चौकशीचा फार्स करणार. सखोल म्हणजे किती खोल जाणार आहात. कशाला हे थोतांड सुरु आहे," असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. 

"मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना राज्यात काय सुरु आहे याची रोज कल्पना दिली जाते. मग आपल्या एक फूल, दोन हाफला हे आंदोलन होत आहे याची माहिती नव्हती का? बारसूत जो काही लाठीचार्ज झाला, वारकऱ्यांना मारहाण झाली त्याची अद्याप चौकशी सुरु आहे. करोनात जीवाची बाजी लावणारे आपले पोलीस इतके राक्षस होऊ शकतात. म्हणजेच यामागे कोणीतरी आदेश देणारा आहे. पोलीस आदेशाशिवाय असं वागू शकत नाहीत," असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

सरकार आपल्या दारी, थापा मारते लय भारी कार्यक्रम त्यांना घ्यायचा होता, म्हणून बास झालं उठा सांगत होते. पण आंदोलनकर्ते चर्चेची मागणी करत होते. पण घरात घुसून एका वृद्धेलाही मारहाण झाली. आणि  हे लोक सखोल चौकशी करणार म्हणत आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. जी हुकूमशाही आहे तिला चिरडून टाकायला इंडिया आघाडी आली आहे असंही ते म्हणाले. 

घराणेशाहीच्या आम्ही विरुद्ध आहोत असं जे म्हणत आहेत त्यांना सांगायला घराणेच नाही. पहिल कुटुंब सांभाळा मग घराणेशाहीवर बोला असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.
 
2012 ला सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर आंदोलन केलं होतं. सुषमा स्वराज यांचा फोन आला होता. त्यावेळी त्या म्हणत होत्या की भारत बंद करायचं आहे. पण ते बाळासाहेबांना सांगितलं तेव्हा ते म्हटले गणपतीकाळात शक्य नाही सांग त्यांना. आम्ही बंद कऱणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. मी त्या आंदोलनाला गेलो असता सिलेंडर उचलल्याचा फोटो दुसऱ्या दिवशी छापून आला. ते पाहून बाळासाहेब मला ओरडले आणि अंजिओप्लास्टी झाली आहे आणि सिलेंडर उचलतो. तेव्हा त्यांना सांगितल की ते थर्माकॉलचं होतं अशी आठवण उद्धव ठाकरेंनी सांगितली.