धक्कादायक आत्महत्या केलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याच्या भावाचाही मृत्यू

पोलीस उपनिरीक्षकासह व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल

Updated: Dec 23, 2020, 10:33 AM IST
धक्कादायक आत्महत्या केलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याच्या भावाचाही मृत्यू title=

अमरावती : शेतातील संत्रा विकल्यानंतर संत्रा व्यापाऱ्याने फसवुन केल्यामुळे व नंतर पोलिसांनी न्याय देण्याऐवजी उलट मारहाण केल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव येथील एका शेतकऱ्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कडे न्यायाची मागणी करण्यासाठी आत्महत्यापूर्वी चिठ्ठी घेऊन आत्महत्या केली होती. यातील धक्कादायक बाब म्हणजे लहान भावाच्या म्रुत्युचा धसका घेत मोठया भावाचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या शेतकरी आत्महत्या प्रकरनी एका पोलीस उपनिरीक्षकासह दोन व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव येथील अशोक पांडुरंग भुयार या शेतकऱ्याने आपला संत्राचा बगीच्या व्यापाऱ्याला विकला होता. मात्र व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांला पैसे न देता उलट शेतकऱ्याला मारहाण केली होती. तर याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी शेतकरी गेला असता. तेथेही शेतकऱ्याची तक्रार न घेता पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांनी शेतकऱ्याला मारहाण केली. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती.

राज्यमंत्री बच्चू कडू यांना मृत्यू पूर्वी चिठ्ठी लिहून केली न्यायाची मागणी.....

दरम्यान मला मृत्यूनंतर तरी न्याय मिळावा यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावाने चिठ्ठी लिहून घटनेची माहिती दिली होती. त्यामुळे मृतक शेतकऱ्याच्या मुलाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता यात अंजनगाव सूर्जीचे पोलीस उपनिरीक्षक दिपक जाधव संत्रा व्यापारी शेख अमीन व शेख गफूर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक गुन्हा दाखल होताच घटनास्थळ वरून पसार झाला आहे.

लहान भावाच्या जाण्याने मोठ्या भावाचाही हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

मृतक शेतकऱ्यांच्या अंत्यसंस्कार करून परत घरी येताच लहान भावाच्या मृत्यूचा धक्का बसलेल्या संजय भुयार यांचा रात्री 9:15 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे एकाच दिवशी दोन भावाचा मृत्यू झाल्याने भुयार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर याप्रकरणी अद्यापही यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. तर 24 तारखेला बच्चू कडू आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबाला भेटण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.