निरेपासून तयार होणार साखर, भाटे संशोधन केंद्राचा प्रयोग

नीरेपासून मिळणारी साखर अत्यंत उपयुक्त 

Updated: Jan 14, 2020, 01:39 PM IST
निरेपासून तयार होणार साखर, भाटे संशोधन केंद्राचा प्रयोग title=
प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : तुम्ही तुमच्या गावात नीराची टपरी अनेकदा बघितली असेल. नीरा आरोग्याला कशी उपयुक्त आहे, याची पाटीही लावलेली असते. पण या नीरेपासून तयार होणारी साखरही तितकीच उपयुक्त असते आणि आता कोकणामध्ये ही साखर तयार करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे.



नारळाच्या फुलांपासून काढला जाणारा रस म्हणजे नीरा हे आरोग्यदायी पेय. आता या निरेपासून साखर तयार करण्याचा यशस्वी प्रयोग रत्नागिरीतल्या भाटे संशोधन केंद्रात करण्यात आला आहे. नीरेमध्ये साखरेचं प्रमाण केवळ १४ ते १८ टक्के असतं. उसापासून तयार होणाऱ्या साखरेचा ग्लाईसेमिक निर्देशांक ६५ असतो तर नीरेच्या साखरेमध्ये तो केवळ ३५ असतो. त्यामुळे मधुमेहींसाठी ही साखर उपयुक्त असल्याचं मानलं जात आहे. ऊसाच्या साखरेचा रंग पांढरा असतो तर नीरेची साखर तांबूस रंगाची असते.



भारतात अंदाजे 60 ते 65 रूग्ण हे मधुमेहाशी निगडीत रोग झालेले आहेत. गोड खायचं असेल तर निरापासून तयार केलेली मिठाई, गोड पदार्थ हे मधुमेह झालेले रूग्ण खावू शकतात. भविष्यात या निरेच्या साखरेला मागणी प्रचडं होणार आहे, असे 
डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे  विद्यावेत्ता डॉ वैभव शिंदे यांनी म्हटलं आहे. 



ऊसाची साखर अंदाजे 80 रूपये किलो दरानं विकली जाते. निरेपासून तयार झालेल्या साखरेचा दर अंदाजे हजार रुपयांच्या घरात असतो. नीरेपासून साखर तयार करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. अंदाजे २० ते २५ वर्षांच्या झाडापासून नीरा काढली जाते. पोईला दोरीनं घट्ट बांधून ठेवलं जातं. पोयीचा समोरचा भाग कोयत्यानं कापून त्यापुढे नीरा गोळा करण्यासाठी भांडं लावल जातं. दुस-या दिवशी सूर्योदयापूर्वी नीरा काढली जाते. सूर्योदयानंतर नीरा काढल्यास त्याचे गुणधर्म बदलतात आणि त्याला ताडी किंवा माडी म्हणतात. नीरा काढल्यानंतर लगेच स्टीलच्या भांड्यात तापवली जाते. त्याचा घट्ट गोळा थंड करून मिक्सरमधून काढला की आपल्याला साखर मिळते. याचं शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेतल्यास मोठी रोजगार निर्मिती होवू शकते

 
'आज मी महिन्याला 100 किलो निरेची साखर विकतो एक हजार रूपये किलो दराने ही साखर विकली जाते.. त्यातून मला महिन्याला सर्व खर्च वजा होवून अंदाजे 30 हजारापर्यंतचा नफा होतो आता या साखरेची मागणी प्रचंड वाढलेली आहे त्यासाठी माझ्याकडे आता वितरणासाठी लोकं येत आहेत...पण अतिक्षय सोप्या पद्धतीने ही निरेपासून चांगली साखर तयार होते', असे प्रशिक्षण घेतलेला तरूण तुषार आग्रे सांगतो.


या अगोदर केरळमध्येही असा प्रयोग करण्यात आला आहे. कोकणामध्ये नारळाच्या झाडांना पोषक हवा असल्यामुळे हा उद्योग तिथं चांगलं उत्पन्नाचं साधन होऊ शकतो.