...या अटींवर मिळालाय छगन भुजबळांना जामीन

मार्च २०१६ पासून भुजबळ तुरुंगात आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी भुजबळांना अटक करण्यात आली होती. 

Updated: May 4, 2018, 07:13 PM IST
...या अटींवर मिळालाय छगन भुजबळांना जामीन title=

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना अखेर उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. पाच लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय. तब्बल दोन वर्षांनंतर छगन भुजबळ हे तुरुंगातून बाहेर येणार आहेत. मात्र, आजच त्यांची सुटका होण्याबाबत संभ्रम आहे. कारण भुजबळांच्या वकिलांना निकालाची प्रत सोमवारी मिळणार असल्यामुळे सोमवारीच त्यांची सुटका होण्याची चिन्ह आहेत. सुटका झाल्यानंतर भुजबळ उपचारांसाठी  रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे.  मार्च २०१६ पासून भुजबळ तुरुंगात आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी भुजबळांना अटक करण्यात आली होती. पण मनी लॉन्ड्रिंग कायद्यातलं कलम ४५ (१) रद्द झाल्यानं आज अखेर उच्च न्यायालयानं भुजबळांना जामीन दिला. 

पाहुयात, छगन भुजबळांना कोणत्या अटींवर जामीन दिला गेलाय.... 

- पाच लाखांच्या जातमुचलक्यावर भुजबळांची सुटका होणार आहे

- भुजबळांना चौकशीसाठी तपास यंत्रणांना सहकार्य करावं लागणार आहे

- न्यायालयाच्या परवानगीशिवाय राज्याबाहेर जाता येणार नाही

- छगन भुजबळ यांचा पासपोर्ट याआधीच जप्त करण्यात आलेला आहे

- साक्षीदारांशी संपर्क करण्यास मनाई करण्यात आलीय

दरम्यान, छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यावर येवल्यात त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला तर नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.