ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, घोडबंदरमधील ट्रॅफीक कमी करण्यासाठी MMRDAचा मोठा निर्णय

MMRDA Coastal Road: घोडबंदरवर होणाऱ्या मोठ्या ट्रॅफिक जॅमपासून वाहनचालकांची सुटका होणार आहे. त्यांची नेहमीची अडचण कमी करण्यासाठी एमएमआरडीएने महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 18, 2023, 03:37 PM IST
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, घोडबंदरमधील ट्रॅफीक कमी करण्यासाठी MMRDAचा मोठा निर्णय title=

MMRDA Coastal Road: ठाण्यातील नागरिकांना घोडबंदर रोडवर होणाऱ्या ट्रॅफिक जॅमचा नेहमीच त्रास होत असतो. अरुंद रस्ते, वाढती वाहने यांमुळे संध्याकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळेस येथे हमखास गर्दी पाहायला मिळते. पण आता ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. घोडबंदरवर होणाऱ्या मोठ्या ट्रॅफिक जॅमपासून वाहनचालकांची सुटका होणार आहे. त्यांची नेहमीची अडचण कमी करण्यासाठी एमएमआरडीएने महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

भिवंडी आणि कळव्याहून बाळकुम मार्गे घोडबंदर रोडकडे जाणारे वाहनचालक सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी वाहतुकीत अडकतात. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होते. आजारी, गर्भवती महिला, रुग्णवाहिका यांना या वाहतुक कोंडीचा फटका बसतो.

ठाण्यातील बाळकुम ते गायमुखपर्यंत कोस्टल रोड तयार करण्याची योजना एमएमआरडीएने आखली असून हा रस्ता तीन वर्षांत पूर्ण केला जाणार आहे. बाळकुम ते गायमुख या ठाणे कोस्टल रोडच्या बांधकामासाठी तपशीलवार अभियांत्रिकी आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार सेवांसाठी सल्लागार नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी एमएमआरडीएकडून निविदा मागवल्या असल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मिड डे वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. 

प्रकल्पासाठी लागणारा कालावधी

13 किलोमीटर प्रकल्पाच्या निविदेनुसार, यशस्वी बोलीदाराला करारपूर्व टप्प्यासाठी सुमारे 3 महिने, बांधकाम पर्यवेक्षणासाठी 36 महिने आणि दोष दायित्व कालावधी म्हणून 60 महिने इतका कालावधी दिला जाणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

यापूर्वी ठाणे महापालिकेने 13 किलोमीटर लांबीच्या कोस्टल रोडचा सविस्तर प्रकल्प अहवाल एमएमआरडीएकडे पाठवला होता, मात्र नंतर आराखड्यात काही बदल करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

खर्चाला मंजुरी

या रस्त्याची संकल्पना  2007 मध्ये पहिल्यांदा मांडण्यात आली. यानंतर एमएमआरडीएला रस्त्यासाठी 1 हजार 316 कोटी रुपये खर्च करण्यासही मंजुरी मिळाली असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली. 

हा रस्ता ठाणे खाडीजवळून जाणार असल्याने त्याला सीआरझेड मंजुरी आवश्यक आहे. तसेच कोलशेत नौदल शिबिराजवळ भूमिगत बोगदा असणार असून त्यासाठी एमएमआरडीएला संरक्षण मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे.