मुंडेंच्या घरातलं आणि राजकारणातलं वादळ शमलं

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा 

Updated: Jan 22, 2021, 06:36 PM IST
मुंडेंच्या घरातलं आणि राजकारणातलं वादळ शमलं title=

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करून खळबळ उडवून देणाऱ्या रेणू शर्मा नावाच्या महिलेनं आता आरोप मागे घेतले आहेत. त्यामुळं मुंडेंच्या घरातलं महाभारत संपलं आहे. 

अवघ्या काही दिवसांपूर्वीच रेणू शर्मा नावाच्या महिलेनं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. धनंजय मुंडे यांच्यावर या महिलेनं थेट बलात्काराचे गंभीर आरोप केले होते. त्यामुळं अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपच्या महिला मोर्चानं जोरदार आंदोलन केलं होतं. मात्र रेणू शर्मानं आता घूमजाव केला आहे.

धनंजय मुंडे आणि माझी बहिण करुणा शर्मा यांच्यात कोर्टबाजी सुरू झाल्यानं मी मानसिक दबावाखाली होते. मोठ्या राजकीय षडयंत्राचा मी शिकार बनत होते. विरोधी पक्ष माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडत होते. कुटुंबाची बदनामी होऊ नये, यासाठी आता सगळे आरोप मागे घेतेय. धनंजय मुंडेंविरोधात माझी कसलीही तक्रार नाही. असं रेणू शर्मा यांनी लेखी निवेदनात स्पष्ट केलं आहे.

या आशयाचं नोटरी केलेलं शपथपत्र सादर करा, असं मुंबई पोलिसांनी रेणू शर्मा यांना कळवलं आहे. त्यामुळं ही केस आता बंद झाली. दरम्यान, मुंडेंवरील कलंक दूर झाल्यानं राष्ट्रवादीच्या गोटात समाधानाचं वातावरण आहे. तर भाजपमध्ये मुंडे प्रकरणावरून अजूनही परस्परविरोधी मतं असल्याचं समोर आलं आहे.

रेणू शर्मा यांनी आरोप मागे घेतल्यानं धनंजय मुंडेंचं मंत्रीपद वाचलं आहे. पण यानिमित्तानं धनंजय मुंडेंना करुणा शर्मा नावाच्या महिलेपासून दोन मुलं झाली आहेत. या दोन्ही मुलांचा तसंच करुणा शर्मांचा सांभाळ मुंडेच करतायत, हे वास्तव देखील यानिमित्तानं महाराष्ट्रपुढं आलं.