उर्मिला मातोंडकर यांच्या उमेदवारीबाबत विजय वडेट्टीवार यांचा गौप्यस्फोट

विजय वडेट्टीवार यांचा गौप्यस्फोट..

Updated: Oct 31, 2020, 07:34 PM IST
उर्मिला मातोंडकर यांच्या उमेदवारीबाबत विजय वडेट्टीवार यांचा गौप्यस्फोट title=

मुंबई : सध्या राज्यात विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी कोणाला उमेदवारी मिळते याबाबत चर्चा आहे. त्यातच सर्वात जास्त चर्चा आहे ती उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची. कारण त्यांना शिवसेनेकडून विधानपरिषदेवर पाठवले जाण्याची चर्चा राज्यात सुरु आहे. गेल्या वर्षी काँग्रेसमधून निवडणूक लढवणाऱ्या उर्मिला मातोंडकर या शिवसेनेच्या कोट्यातून आमदार होणार असल्याच्या चर्चा रंगल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. त्यातच काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आणखी एक खुलासा केला आहे.

विधानपरिषदेसाठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेच्या आमदारकीची ऑफर स्विकारली असल्याची माहिती आहे. पण उर्मिला मातोंडकरांच्या नावाची चर्चा सुरु असतानात वडेट्टीवार यांच्या एका विधानाने पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की, प्रत्येकाला आपला राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार असतो. उर्मिला यांनी शिवसेनेची ऑफर स्विकारली असावी, कोणी कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळवावी. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. काँग्रेसनेही उर्मिला यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी देऊ केली होती. परंतु तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला होता. त्या राज्यसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.'

विजय वडेट्टीवार यांच्या या विधानानंतर उर्मिला यांनी काँग्रेसची ऑफर नाकारली तर मग शिवसेनेची ऑफर का स्विकारली अशी चर्चा रंगू लागली आहे.