Pune News : सासवडच्या दिवे घाटात जखमी बिबट्याने उडवली भंबेरी; वाहतुकीचा खोळंबा, पाहा Video

Pune Leopard Viral Video : पुणेकर शेवटी पुणेकरच... लोकांनी बिबट्याला बघून पळ काढला नाही. तर गाड्या उभ्या करून त्याला पाहत राहिले. थोड्या वेळाने बिबट्या उठला अन्...

Updated: Sep 4, 2023, 05:18 PM IST
Pune News : सासवडच्या दिवे घाटात जखमी बिबट्याने उडवली भंबेरी; वाहतुकीचा खोळंबा, पाहा Video title=
Pune Leopard Viral Video

leopard In Pune Dive Ghat : पुणे शहर म्हणजे चहुबाजुने डोंगरांनी वेढलेलं शहर... अगदी कपबशीतल्या बशीसारखं... त्यामुळे अनेकदा जंगली प्राणी शहरात दिसल्याच्या घटना समोर येत असतात. अनेकदा जंगली प्राणी म्हणजे बिबट्या, वाघ, सिंह यांसारखे प्राणी मानवी वस्तीत येतात आणि पाळीव प्राण्याची शिकार करतात. तर अनेकदा माणसांवर देखील हल्ला झाल्याचं पाहण्यात आलं आहे. दिवसेंदिवस बिबट्याची दहशत पुणे शहरात (Pune News) वाढत चालली आहे. अशातच आता सासवडमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सासवडच्या दिवे घाटात  (Leopard In Dive Ghat) चक्क बिबट्याने ट्रॉफिक जाम केल्याचं दिसून आलं.

सध्या सोशल मीडियावर रस्त्यावर बसलेल्या बिबट्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला. यामध्ये एक जखमी अवस्थेत असलेल्या बिबट्या रस्त्याच्या मधोमध बसल्याचं दिसतंय. लावून एखादा कुत्रा असल्याचं दिसत होतं. मात्र, अनेकांनी जेव्हा जवळ जाऊन पाहिलं तेव्हा लोकांची भंबेरी उडाली. पुणेकर शेवटी पुणेकरच... लोकांनी बिबट्याला बघून पळ काढला नाही. तर गाड्या उभ्या करून त्याला पाहत राहिले. थोड्या वेळाने बिबट्या उठला आणि त्याने जाण्यासाठी मार्ग शोधला. त्यावेळी तो एका दुचाकी शेजारी जाऊन उभा राहिला. त्यावेळी दुचाकीस्वारांने थोडं मागं सरकत त्याला रस्ता दिला. मात्र, पळ काढला नाही. बिबट्या जखमी असल्याने त्याला नेमकं काय झालंय हे पाहण्याचा अनेकजण प्रयत्न करत होते.

पाहा Video

बिबट्या दिसल्याची ही घटनेची माहिती लोकांनी लगोलग वनविभागाला दिली. वनविभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, बिबट्या तोपर्यंत पसार झाला होता. अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे बिबट्या जखमी झाला असल्याचं वनविभागानं सांगितलं आहे. घाटातून तो मस्तानी तलावाच्या दिशेने गेल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर वनविभागानं ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याचा शोध सुरू केला. मात्र, त्यांच्या हाती काहीही लागलं नाही.

दरम्यान, जखमी बिबट्याला शोधून त्याच्यावर उपचार करुन त्याला जंगलात सोडण्यात येणार असल्याचं सासवडचे वनविभागाचे प्रमुख व्ही . एस. चव्हाण यांनी सांगितलं आहे. मात्र, आता रात्रीच्या वेळेत घाटातून प्रवास करताना अनेकांना घाम फुटल्याचं पहायला मिळतंय.