ऑनलाइन जमलं, लग्नाचं वचनही दिलं... पण 7 फेरे घेण्याआधीच घडला धक्कादायक प्रकार

विवाहनोंदणी साईटवर तिची आणि त्याची ओळख झाली, पण पुढे काय होईल याचा तीने विचारही केला नव्हता

Updated: Feb 24, 2022, 01:22 PM IST
ऑनलाइन जमलं, लग्नाचं वचनही दिलं... पण 7 फेरे घेण्याआधीच घडला धक्कादायक प्रकार title=
प्रतिकात्मक फोटो

वर्धा : ऑनलाईन लग्न जमवणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. लग्नाचं आमिष दाखवत आरोपीने आधी तरुणीकडून लाखो रुपये उकळले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. वर्ध्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. 

नेमकी घटना काय?
वर्ध्यातल्या सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहाणारी 29 वर्षीय पीडित तरुणी सावनेर इथं स्टाफ नर्स म्हणून काम करते. या तरुणीने शादी डॉट कॉम या ऑनलाईन साईटवर लग्नासाठी नोंदणी केली होती. इथेच तिची सागर पाटील या तरुणाशी ओळख झाली. सागर हा अमरावती जिल्ह्यातल्या मुऱ्हादेवी इथं राहाणारा आहे. 

सागर आणि पीडित तरुणीचं मोबाईलवर बोलणं सुरु झालं आणि भेटीगाठी सुरु झाल्या. सागरने आपण पिंपरी चिंचवड महापालिकेत कनिष्ठ अभियंता असून माझे दोन फ्लॅट असल्याची माहिती दिली. तसंच वडिल कृषी विभागातून निवृत्त झाल्याचीही खोटी माहिती दिली. सागरने पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवलं.

पीडित तरुणीही सागरच्या बोलण्याला फसली. याचा गैरफायदा घेत सागरने वेळोवेळी पीडित तरुणीकडून पैसे उकळले. जवळपास 25 लाख रुपये सागरने या तरुणीकडून घेतले. पण तो इतक्यावरच थांबला नाही. त्याने तरुणीला पचमढी इथं नेऊन तिच्यावर बलात्कार केला. 

सागरचं खरं रुप कळल्यावर तरुणीला धक्का
काही दिवसातच सागरच खरं रुप कळलं. सागरने दुसऱ्या मुलीशी लग्न केल्या पीडित तरुणीला कळलं. हा प्रकार समजल्यानंतर पीडितेच्या पायाखालची जमीन सरकली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तीने  सेवाग्राम पोलिसांत तक्रार दिली यावरून सेवाग्राम पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.