गंगापूर भरलं तरी नाशिकमध्ये पाणी टंचाई, हे आहे कारण

स्मार्ट सिटी स्पर्धेत धावणाऱ्या नाशिक शहरात तब्बल ४१ टक्के पाणी गळती होत असल्याची धक्कादायक माहिती सामोर आलीय. 

Updated: Nov 14, 2017, 08:14 PM IST
गंगापूर भरलं तरी नाशिकमध्ये पाणी टंचाई, हे आहे कारण  title=

मुकुल कुलकर्णी, प्रतिनधी, झी मीडिया नाशिक : स्मार्ट सिटी स्पर्धेत धावणाऱ्या नाशिक शहरात तब्बल ४१ टक्के पाणी गळती होत असल्याची धक्कादायक माहिती सामोर आलीय. शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण तुडुंब भरलेलं असून देखील शहरातील नागरिकांना पाणी टंचाई का जाणवते याचं उत्तर वॉटर ओडीटच्या माध्यामतून सापडलंय. इथल्या नागरिकांना भेडसावणाऱ्या या पाणीबाणीला महापालिकाच जबाबदर असल्याच सामोर आलाय.

१८ ते २० लाख लोकसंख्या असलेल्या नाशिकमध्ये मुबलक पाणी असून देखील शहरवासीयांच्या घशाला कोरड पडलीय. सध्या नाशिकला  दारणा आणि गंगापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातोय. गंगापूर धरणातून प्रतिदिन ४३० दशलक्ष लिटर पाण्याची उचल केली जाते.

शहरात १०९ जलकुंभ आणि ४ जलशुद्धीकरण केंद्र आहे. या माध्यमातूनच नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पुरवठा केला जातो. याच वितरण व्यवस्थेत तब्बल ४१ टक्के गळती आढळून आलीय. एका खाजगी संस्थेन केलेय सर्वेक्षणात हि माहिती समोर आलीय.

जुन्या झालेल्या जलवाहिन्या, जीर्ण जलकुंभ, जल शुद्धीकरण केंद्र अशा सर्वच टप्यावर ही गळती होत असलायचे समोर आलंय. नाशिककरांवर जेव्हा जेव्हा घरपट्टी पाणीपट्टी लादण्याचा निर्णय घेण्यात येतो तेव्हा तेव्हा पाणी पुरवठा दरम्यानची गळती थांबविण्याची मागणी केली जाते. मात्र पालिका प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्यानं नागरीक आक्रमक झालेत.

खाजगी संस्थेन केलेलं वॉटर ऑडीट स्मार्ट सिटीत डेवलपमेंट कॉर्पोरेशनला सादर केलं जाणार आहे. त्यातून गावठाण  भागातील जलवाहिनी बदलणे, २४ तास पाणी पुरवठ्याची सोय करणे, स्मार्ट मीटर बसविणे अशी कामं अपेक्षित आहेत. महापालिकेनंही पाणी गळती होत असल्याचं कबूल केलंय. पण केवळ कबुली नकोय तर गळती थांबवण्यासाठी तातडीनं उपाय योजना करणंही गरजेचं आहे.