राखीसाठी पैसे न दिल्याने तिने घेतला गळफास

रक्षाबंधनाचा पवित्र सण राज्यात तसेच देशभरात आनंदात साजरा करण्यात आला. पण याच पार्श्वभुमीवर बेळगावमध्ये एक दुर्देवी घटना घडली.

Updated: Aug 8, 2017, 09:36 AM IST
राखीसाठी पैसे न दिल्याने तिने घेतला गळफास title=

बेळगाव : रक्षाबंधनाचा पवित्र सण राज्यात तसेच देशभरात आनंदात साजरा करण्यात आला. पण याच पार्श्वभुमीवर बेळगावमध्ये एक दुर्देवी घटना घडली.

आपल्या भावला राखी बांधण्यासाठी एका महिलेने पतीकडे दहा रुपये मागितले. पण पतीने पैसे देण्यास नकार दिल्याने भावनावश होऊन तिने गळफास घेऊन स्वत: ला संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 भाऊ-बहिणीने एकमेकांची रक्षा करण्याचा, आशीर्वाद, प्रेमाचे बंध बांधण्याचा हा रक्षाबंधनाचा सण असतो. पण भावाला राखी बांधण्याआधीच तिने स्वत:ची जिवनयात्रा संपविली. महादेवी अशोक गोल्लर असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. अशोक गोल्लर आणि महादेवी यांचा तीन वर्षांपूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला आहे. तिचा पती अशोकचा भंगाराचा व्यवसाय आहे.

विवाहानंतर अशोकला दारूचे व्यसन लागले आणि वाद होऊ लागले. लग्नाआधी  आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका केल्यानंतर अशोकचे हे वर्तन तिला अचंबित करणारे होते. दरम्यान अशोक आणि महादेवी यांच्या प्रेमविवाहामुळे दोन्ही कुटुंबात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे तिचे माहेरी जाण्याचे मार्ग ही बंद झाले होते.

 रक्षाबंधनच्या निमित्ताने माहेरी जाऊन भावाला राखी बांधावी आणि दोन्ही कुटुंबातील कटुता संपवावी असे महादेवीला वाटत होते. त्यामुळे राखी आणण्यासाठी महादेवीने पतीकडे दहा रुपये मागितले. नेहमी मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या अशोकने राखीसाठी दहा रुपये देण्यास नकार दिला. महादेवीने पुन्हा पुन्हा दहा रुपयांची मागणी केल्यावर अशोकने महादेवीला शिवीगाळ केली आणि तो घरातून बाहेर पडला. या गोष्टीचा तिच्या मनावर जास्त परीणाम झाला. पैसे न देणं, पतीची मारहाण हे सर्व तिच्या जिव्हारी लागले होते. ही गोष्ट महादेवीने मनाला लावून घेतली आणि महादेवीने गळफास घेऊन आत्महत्या केली.