नऊ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर... नियुक्ती पत्राऐवजी हाती नियुक्ती रद्दीचं पत्र!

सरकारी यंत्रणेतला सावळा गोंधळ प्रकाश येऊ नये यासाठी रात्रीच्या अंधारात सगळ्यांना प्रबोधिनीतून बाहेर काढण्याचा घाट घालण्यात आला

Updated: Oct 9, 2018, 12:23 PM IST
नऊ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर... नियुक्ती पत्राऐवजी हाती नियुक्ती रद्दीचं पत्र!  title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : पोलीस उपनिरीक्षक भरती, पदोन्नतीचा घोळ आणि मॅटच्या आदेशाची अंमलबजावणी करतानाचा सावळागोंधळ झी २४ तासनं सोमवारी सर्वात आधी समोर आणला. पण त्यामुळे नियुक्त्या रद्द झाल्यावर गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचं पितळ उघडं पडलं. उरली सुरली इभ्रत वाचवण्यासाठी १५४ जणांना रात्रीच्या अंधारात घरी पाठवण्याचा घाट प्रशासनानं घातला. पण 'झी २४ तास'च्या कॅमेरात हे सारं चित्रीत झालंच...

९ महिने रक्ताचं पाणी करून प्रशिक्षण घेतलं.. पण पोलीस उपनिरीक्षकाची वर्दी घालण्याआधीच सगळ्यावर पाणी फिरलं...नाशिकच्या पोलीस प्रबोधिनीबाहेर आज सकाळची ही दृश्य... १५४ जणांच्या नियुक्त्या महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅटनं रद्द केल्यात. त्यामुळे त्या सर्वांना रात्री उशिरा आपल्या मूळपदी जाण्याचे आदेश देण्यात आले. सरकारी यंत्रणेतला सावळा गोंधळ प्रकाश येऊ नये यासाठी रात्रीच्या अंधारात सगळ्यांना प्रबोधिनीतून बाहेर काढण्याचा घाट घालण्यात आला.

नाशिकच्या पोलीस प्रबोधिनितून ८२८ जणांची यशस्वी पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली. मुख्यमंत्र्यांसमोर शानदार सोहळा झाला...पण ज्या दिवशी नियुक्तीची पत्र मिळणं अपेक्षित होतं, त्याच दिवशी न्याधिकरणाचा आदेश आला. त्याचं झालं असं...

 

- राज्य सरकारनं ८२८ उपनिरीक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला 

- लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ही भरती करण्यात आली

- परंतु काही पदं भरताना पदोन्नतीमधील आरक्षण लागू करण्यात आलं

- आरक्षण लागू केल्यामुळे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला

- १२५ जणांकडून पदोन्नतीला आरक्षणला मॅटमध्ये आव्हान दिलं

- कायदा नसताना पदोन्नतीमध्ये आरक्षण देणे अयोग्य असल्याचा मॅटनं निर्णय दिला
 
पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू होण्याची वेळ आलेली असताना हाती नियुक्तीपत्राऐवजी नियुक्ती रद्द झाल्याचं पत्र हाती आलं. त्यामुळे तेल गेलं, तूप गेलं हाती आलं धुपाटणं अशा मनस्थितीत अनेकांनी प्रबोधिनी सोडली... ९ महिन्यानंतर मिठाईऐवजी प्रश्नांचा डोंगर घेऊनच १५४ जण घरी परतले.