'झी २४ तास'चा इम्पॅक्ट । लोकलच्या १५० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय

कोरोनाचे संकट असल्याकारणाने मुंबई लोकल सेवा बंद आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेसाठी विशेष लोकल चालविण्यात येत आहेत. 

Updated: Sep 19, 2020, 11:14 AM IST
'झी २४ तास'चा इम्पॅक्ट । लोकलच्या १५० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय  title=
संग्रहित छाया

अमित जोशी / मुंबई : कोरोनाचे संकट असल्याकारणाने मुंबई लोकल सेवा बंद आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेसाठी विशेष लोकल चालविण्यात येत आहेत. मात्र, या लोकल कमी असल्याने लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सचे तीन-तेरा वाजल्याचे दिसून येत आहेत. याबाबत 'झी २४ तास'ने वृत्त प्रसारित केले होते. 'झी २४ तास'च्या बातमीची दखल अखेर पश्चिम रेल्वेने घेतली आहे. त्यानुसार होणारी गर्दी टाळण्यासाठी लोकलच्या १५० फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेल्या लोकलमध्ये सकाळी आणि संध्याकाळी असलेल्या गर्दीची बातमी  'झी २४ तास'ने नुकतीच दाखवलेली होती. प्रवास करणारे कर्मचारी जास्त आणि लोकल सेवा अत्यंत मर्यादित अशी सध्याची परिस्थिती आहे. यामुळे लोकल ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्स ठेवणे हे निव्वळ अशक्यप्राय गोष्ट झाली होती. त्यामुळे अत्यावश्यक  सेवेशी संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये लोकल प्रवासामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती पसरली आहे. 

याबाबत  'झी २४ तास'शी बोलताना अनेक कर्मचाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. तेव्हा या बातमीची दखल पश्चिम रेल्वेने घेतली असून सोमवारपासून लोकलच्या १५० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेला जाग आली असतांना आता मध्य रेल्वेला जाग येणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, वाढविण्यात आलेल्या दीडशे लोकलपैकी ३० लोकल सकाळी गर्दीच्या वेळेत तर २९ लोकल संध्याकाळी गर्दीच्या वेळेत चालवल्या जाणार आहेत. तर दुसरीकडे विशेष लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिंगबाबतचे नियम पाळावेत तसेच प्रवास करताना मास्क वापरावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

या विशेष लोकल केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठीच चालवल्या जात असून त्याशिवाय कुणालाही या लोकलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असे पुन्हा एकदा नमूद करण्यात आले आहे.

0