मुंबई आयआयटीच्या वर्गात गाय शिरते तेव्हा...

बाहेर जोरदार पाऊस पडत असल्यामुळे गाय आतमध्ये आली असावी.

Updated: Jul 29, 2019, 02:39 PM IST
मुंबई आयआयटीच्या वर्गात गाय शिरते तेव्हा... title=

मुंबई: काही दिवसांपूर्वी मुंबई आयआयटीच्या कॅम्पसमध्ये बैलाने विद्यार्थ्याला शिंगांनी उडवून जखमी केले होते. या प्रकारानंतर आता पुन्हा एकदा आयआयटीमधील एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

या व्हीडिओमध्ये एक गाय आयआयटीच्या वर्गात शिरलेली दिसत आहे. ही गाय वर्गात शिरल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. गायीने आतमध्ये प्रवेश केल्यानंतर वर्गात फेरफटका मारायला सुरुवात केली. यावेळी काही विद्यार्थ्यांनी तिला हुसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी गाय हल्ला करेल या भीतीने विद्यार्थी जागेवर उठून उभे राहिले होते. 

प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी हा प्रकार घडला. मात्र, हा व्हीडिओ नक्की आयआयटीमधीलच आहे का, याबद्दल प्रशासनाकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. आम्ही लवकरच या प्रकाराची चौकशी करू, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

मात्र, विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार घडला तेव्हा बाहेर जोरदार पाऊस पडत होता. त्यामुळे गायीने आसऱ्यासाठी इमारतीमध्ये प्रवेश केला असावा. यानंतर ती थेट वर्गात पोहोचली, अशी माहिती आयएनएस वृत्तसंस्थेने दिली आहे. 

या सगळ्या प्रकारानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. ही गाय प्रवेश परीक्षा न देताच आयआयटीमध्ये आली, अशी टिप्पणी एका नेटकऱ्याने केली आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर आयआयटी प्रशासनाने कॅम्पसच्या परिसरात गाई-बैलांसाठी शेल्टर उभारण्याचा विचार सुरू केला आहे. त्यासाठी आयआयटी व्यवस्थापन मंडळाने कॅम्पस परिसरात योग्य अशी जागा पाहण्यास देखील सुरुवात केल्याचे समजते. 

विद्यार्थ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पालिकेने परिसरातील भटके बैल आणि गायी यांना पकडण्यासाठी कारवाई सुरु केली होती. मात्र कॅम्पस भागात असणाऱ्या गायी व बैल हे आयआयटीच्या मालकीचे असल्याचा दावा करत आयआयटीतील काही कर्मचाऱ्यांनी याला विरोध केला होता. यामुळे कारवाईसाठी आलेल्या पालिका अधिकारी आणि आयआयटी कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली होती.