मुंबईकरांसाठी नवीन वर्षाची भेट, दुसरी आरामदायी एसी लोकल

मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. नवीन वर्षानिमित्ताने मुंबईत दुसरी वातानुकुलित लोकल रेल्वे धावणार आहे. 

सुरेंद्र गांगण | Updated: Dec 29, 2018, 09:40 PM IST
मुंबईकरांसाठी नवीन वर्षाची भेट, दुसरी आरामदायी एसी लोकल  title=

मुंबई : मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक आरामदायी आणि गारेगार होणार आहे. नवीन वर्षानिमित्ताने मुंबईत दुसरी वातानुकुलित लोकल रेल्वे धावणार आहे. जानेवारीत ही रेल्वे गाडी चालविण्यात येणार आहे. 12 डब्ब्यांची ही लोकल असणार असून एका डब्ब्यातून दुसऱ्या डब्ब्यात सहज प्रवेश करता येणार आहे. हे या नवीन लोकलचे खास वैशिष्ट्य आहे. आधीच्या एसी लोकलमध्ये 5964 प्रवाशांना बसता येत आहे. मात्र, नव्या एसी लोकलमध्ये 350 प्रवाशी जास्त बसू शकतात. या गाडीत अनेक चांगल्या सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत.

नवीन एसी लोकल ही 110 किमी वेगाने धावू शकणार आहे. हा लोकलचा सर्वाधिक वेग असणार आहे. तसेच पहिलांदाज नव्या लोकलमध्ये येणे-जाण्यासाठी पॅसेज असणार आहे. त्यामुळे एका डब्ब्यातून दुसऱ्या डब्ब्यात सहज प्रवेश करणे शक्य होणार आहे. आतापर्यंत अशी सुविधा लोकल गाड्यांमध्ये नव्हती. ती या नव्या एसी लोकलमध्ये असणार आहे. ही लोकल सोलर ऊर्जेवरही धावू शकते. कारण या लोकलच्या डब्ब्यावर सोलर पॅनेल बसविण्यात आलेत. हाही नवीन बदल आहे. तसेच या गाडीत जीपीएस, टॉक बॅक यंत्रणा आहे. ही नवीन गाडी देशातच तयार करण्यात आली आहे.

मुंबईत पहिली एसी लोकल ही पश्चिम रेल्वे मार्गावर धावत आहे. या गाडीला प्रवाशांची पसंती मिळत आहे. आता नवीन एसी लोकल दाखल झाल्यानंतर शनिवार आणि रविवारही ही गाडी धावेल. या नवीन एसी लोकलची चाचणी घेतल्यानंतर ती नियमित सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आता गारेगार होणार आहे.

या नवीन एसी गाडीत अनेक चांगल्या सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत.