मुंबईकरांसाठी मोठी बातमी, 'बेस्ट'चा प्रवास 1 मार्चपासून महागणार

Mumbai BEST : उपनगरी रेल्वेच्या बरोबरीने मुंबईकर प्रवाशांची जीवनवाहिनी बनलेली 'बेस्ट' लाखो मुंबईकरांच्या सेवेत आहे. दररोज लाखो मुंबईकर बेस्ट बसने प्रवास करतात. पण मुंबईकरांचा प्रवास आता महागणार आहे. 

कृष्णात पाटील | Updated: Feb 29, 2024, 08:49 PM IST
मुंबईकरांसाठी मोठी बातमी, 'बेस्ट'चा प्रवास  1 मार्चपासून महागणार title=

Mumbai : मुंबईकर प्रवासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 'बेस्ट' आणि 'लोकल' ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. बेस्टमधून (BEST) दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात.  बेस्ट बसने दररोज जवळपास 35 लाख प्रवासी प्रवास करतात यातन मासिक पास (Monthly Pass) काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. पास काढून प्रवास करणाऱ्या बेस्ट प्रवाशांची संख्या 10 लाख 40 हजार इतकी आहे. पण मासिक पास काढून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास महान होणआर आहे. 

बेस्ट प्रशासनाने मासिक पासात 150 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मासिक पास आता 750 वरून 900 रुपये इतका झाला आहे. तर दैनंदिन पास (Daily Pass) 50 रुपयांवरुन 60 रुपये इतका झाला आहे. दैनंदिन नियमित तिकीट दरात कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. नवी दरवाढ 1 मार्चपासून लागू होणार आहे. 

दैनंदिन आणि मासिक पासनुसार अमर्याद प्रवास, सर्व एसी बसमधून प्रवासाची सुविधा कायम असल्याचे 'बेस्ट'ने स्पष्ट केलंय. नव्या सुधारित दरांनुसार 42 ऐवजी 18 बसपास करण्यात आले आहेत. बसपास सहा रुपये, 13 रूपये, 19 रूपये आणि 25 रुपयेपर्यंतच्या वातानुकूलित आणि विनावातानुकूलित प्रवासभाड्याच्या अनुषंगाने साप्ताहिक आणि मासिक स्वरुपात उपलब्ध करण्यात आले आहेत. विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना 200 रुपयांचा मासिक बसपास उपलब्ध असून या बसपासच्या सहाय्याने अमर्याद बसफेर्‍यांची सुविधा कायम ठेवण्यात आलेली आहे

नव्या योजनेची वैशिष्ट्ये
ज्येष्ठ नागरिकांना मासिक बस पासमध्ये 50 रुपये सवलत कायम ठेवण्यात आली आहे. साप्ताहिक बस पासमध्ये मात्र कोणतीही सवलत नाही. पालिका शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या गणवेशधारक विद्यार्थ्यांना तसेच 40 टक्के आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग प्रवाशांच्या मोफत प्रवासाच्या बसपासमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. बेस्ट उपक्रमाचे सेवानिवृत्त कर्मचार्‍यांसाठी असलेल्या 900  रुपये आणि अधिस्विकृतीधारक पत्रकारासाठी असलेल्या वार्षिक 365 रुपयांच्या बस पास दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही.

साप्ताहिक पासनुसार ६ रुपयांपर्यंतच्या फेरीकरिता 70 रुपये, 13 रुपयांपर्यंतच्या बस फेरीसाठी 175 रुपये, 19 रुपयांपर्यंत 265 आणि 25 पर्यंतच्या फेर्‍यांसाठी 350 रुपये तिकीट दर असेल