...असे प्रश्न विचारून पालिकेनं बेरोजगारांची चेष्टा केली?

मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. 

Updated: Mar 15, 2018, 03:27 PM IST
...असे प्रश्न विचारून पालिकेनं बेरोजगारांची चेष्टा केली? title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. 

दहावी पास अशी शिक्षणाची अट असलेल्या सफाई कामगारांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमधील प्रश्नपत्रिकेत विचारलेले अत्यंत कठीण प्रश्न उच्च शिक्षितांनाही सोडवता येणार नाहीत असे होते. या प्रकरणी भाजपाचे आमदार भाई गिरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

मुंबई महापालिकेने १३८८ सफाई कामगारांच्या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी सफाई कामगार पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांनी आपली अक्कल गहाण ठेवली होती की काय? असा प्रश्न उपस्थित होतो. सफाई कामगार पदासाठी काढण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न बघून तुम्हालाही चक्कर यायची अथवा प्रश्नपत्रिका काढणाऱ्या अधिकाऱ्यांची अक्कल बघून हसू यायचे.

या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले काही प्रश्न...

- भारताचे ४४ वे सरन्यायाधीश कोण?

- ८८ नक्षत्रांमधील सर्वात विस्तृत नक्षत्र कोणते?

- गायनेशियम म्हणजे काय?

- सिरिकल्चर कशाशी संबंधित आहे?

- लोणच्यामध्ये उपयोगात येणाऱ्या विनेगरमध्ये काय असते?

- फुलांमध्ये अथवा वनस्पतीमध्ये दुसऱ्या फुलांमधील किंवा वनस्पतींमधील पराग कणांच्या होणाऱ्या पराग सिंचनास काय म्हणतात?

- निशा आणि मिशा यांनी अनुक्रमे २००० आणि २७५० गुंतवणूक करून एक व्यवसाय चालू केला. तथापि, मिशा हिला काही महिन्यानंतर आपला पैसा काढावा लागला त्यांच्या परिणामी १२ महिन्यांच्या शेवटचा नफा निशा आणि मिशा यांमध्ये १२:११ या गुणोत्तरांने वाटला गेला. निशा हिने आपला पैसा गुंतवून ठेवलेल्या महिन्यांची संख्या किती.

- ७२ कि.मी. ताशी या गतीने प्रवास करणारी एक आगगाडी ६ सेंकदात एक पोल ओलांडते ही आगगाडी ४८० मीटर फलाट पार करायला किती वेळ लावेल?

अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

या प्रकरणी भाजपाचे आमदार भाई गिरकर यांनी विधानपरिषदे हा मुद्दा उपस्थित करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केलीय. तर मुंबईचे महापौर, समितीचे सदस्य अथवा अधिकाऱ्यांनी हे प्रश्न सोडूवन दाखवावेत, असं आव्हान दिलंय.

परिक्षा पुन्हा होणार?

सफाई कामगारांची ही भरती प्रक्रिया स्थगित करून यासाठी पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणीही भाई गिरकर यांनी केली आहे. आमदार भाई गिरकर यांनी ही गंभीर बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी याप्रकरणी कारवाई करण्याची निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. 

राज्यातील गरीब बेरोजगार हजारोंच्या संख्येने या परीक्षेसाठी मोठ्या आशेने बसले होते. मात्र, आयएएस आणि आयपीएस परीक्षेत विचारण्यात येणारे प्रश्न सफाई कामगारांच्या परीक्षेसाठी विचारल्याने अनेकांची निराशा झाली. असे कठिण प्रश्न विचारून महापालिका प्रशासनाने या बेरोजगारांची चेष्टाच केली, असं म्हटलं तर वावगं ठरायला नको.