'...तर आरएसएसने प्रेतं उचलावीत', 'पीएफआय'वरून काँग्रेसचं भाजपवर टीकास्त्र

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेला मुंबई महापालिकेने काम दिल्यावरून वाद शिगेला पोहोचला आहे. 

Updated: Jun 4, 2020, 04:51 PM IST
'...तर आरएसएसने प्रेतं उचलावीत', 'पीएफआय'वरून काँग्रेसचं भाजपवर टीकास्त्र title=

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेला मुंबई महापालिकेने काम दिल्यावरून वाद शिगेला पोहोचला आहे. यावरून आता काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. प्रेत उचलणाऱ्या मुस्लिम लोकांवर आक्षेप असतील, तर आरएसएसने प्रेतं उचलावीत, अशी टीका काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी केली आहे. पीएफआय ही मोफत काम करणारी संस्था आहे, असंही हुसेन दलवाई म्हणाले आहेत.

पीएफआयने काही चुकीचं केलं असेल, तर कारवाई करावी. देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत, अशी प्रतिक्रिया हुसेन दलवाई यांनी दिली आहे. 

काय आहे पीएफआयचा वाद?

कोरोना काळामध्ये मुंबई महापालिकेने मुस्लिमांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पीएफआय या संस्थेला दिली, यावर देवेंद्र फडणवीसांनी आक्षेप घेतला. राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी कारवाईचे आरोप असलेल्या ‘पीएफआय’ म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेला मुंबई महापालिकेने मान्यता दिली आहे काय? असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला

केरळ, कर्नाटक, झारखंड, उत्तर प्रदेश या राज्यांत या संस्थेवर बंदी घालण्याची कारवाई करण्यात येत आहे. तसंच या संघटनेवर बंदी घालण्याची मागणीही होत आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने तपास हाती घेतलेल्या पीएफआय या संस्थेला महापालिकेने हे काम देणे ही अतिशय धक्कादायक आणि गंभीर बाब आहे, असे फडणवीस यांनी म्हटलं.

अलीकडच्या काळात झालेल्या निदर्शनांमध्ये पीएफआयवर दंगलींसाठी परदेशातून निधी स्वीकारल्याचा आरोप आहे. एनआयएकडून आरोपपत्राची कारवाई सुरू आहे. अशा संस्थेला मुंबई महापालिकेने हे काम देणे म्हणजे एक प्रकारे त्यांच्या वैधतेवर शिक्कामोर्तब करण्यासारखे आहे. या सर्व प्रकाराला मुख्यमंत्र्यांची सहमती आहे का? आणि नसेल तर ज्यांनी याबाबतचा निर्णय केला आहे त्यांच्यावर काय कारवाई करणार? आणि हा निर्णय मागे घेणार का? असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. 

पुणे महापालिकेकडून करार रद्द 

एकीकडे देवेंद्र फडणवीस मुंबई महापालिकेवर टीका करत असताना भाजपची सत्ता असलेल्या पुणे महापालिकेनेही पीएफआयसोबत करार केला. पण फडणवीसांनी आक्षेप घेतल्यानंतर पुणे महापालिकेने पीएफआयसोबतचा करार रद्द केला.