महाराष्ट्रातल्या काही महिलांची धक्कादायक उत्तरं

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 29, 2018, 11:44 PM IST

मुंबई : तुम्हाला नवऱ्यानं मारलं तर चालेल का, असा प्रश्न विचारल्यावर महाराष्ट्रातल्या महिलांनी धक्कादायक उत्तरं दिली आहेत. एका सर्वेक्षणात यासंदर्भातली धक्कादायक आकडेवारी समोर आलीय.

महिलांना हे काय चुकीचं वाटत नाही?

धक्कादायक म्हणजे तब्बल 49 टक्के महिलांना नव-यानं बायकोला मारणं, हे चुकीचं वाटतच नाही.... उलट आम्ही एखादी चूक केली, मग त्यानं मारलं, त्यात काय बिघडलं, इतकी धक्कादायत मतं महिलांची आहेत.राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात हे धक्कादायक वास्तव समोर आलंय. 

पाहा काय आहेत महिलांची मतं

49 % महिलांच्या मते नवऱ्यानं मारण्यात काहीच हरकत नाही 
49 % महिलांना नवऱ्यानं मारण्यात काहीच क्रूर किंवा हिंसक वाटत नाही
नवऱ्याचं ऐकलं नाही, सासू-सासऱ्यांचा अनादर केला, घरातली कामं केली नाहीत,
मुलांकडे लक्ष दिलं नाही, नवऱ्याला लैंगिक सुखासाठी नकार, या कारणांमुळे नवऱ्यानं मारलं तर हरकत नाही, असं या महिलांचं म्हणणं आहे 
75 % महिलांच्या मते दारुच्या आहारी गेलेले नवरे जास्त मारतात
20 % महिलांनी त्यांच्या नवऱ्यांचा मार खाल्लाय
त्यापैकी फक्त 9 % महिलांनी घरगुती अत्याचारांविरोधात दाद मागितली
4658 महिला आणि 4497 पुरुषांना समाविष्ट करुन हे प्रतिकात्मक सर्वेक्षण करण्यात आलं....
क्षुल्लक कारणावरुन नव-याचा मार खाण्याची बायकांची तयारी आहे. 

नव-यानं मारलं तरी चालेल 

नवऱ्याला न सांगता बाहेर गेली म्हणून नव-यानं मारलं तरी चालेल असे 19 % महिलांचं तर 9 % पुरुषांचं मत आहे.घरकामाकडे, मुलांकडे लक्ष दिलं नाही म्हणून नव-यानं केलेल्या मारहाणीचं 28 टक्के महिला  आणि 17 टक्के पुरुष समर्थन करतात 

नव-यानं हात उचलला तरी चालेल

नवऱ्याबरोबर झालेल्या भांडणात नव-यानं हात उचलला तरी चालेल असं 20 % महिलांना आणि  16 % पुरुषांना वाटतं. लैंगिक संबंधांना नकार दिला म्हणून नव-यानं मारहाण केली तरी 12 टक्के महिलांना चालतं, 8 टक्के पुरुषांना यात काहीच गैर वाटत नाही.

18 टक्के महिला मार खायला तयार

स्वयंपाक नीट करता येत नाही म्हणून 18 टक्के महिला मार खायला तयार आहेत... आणि 8 टक्के पुरुषांना बायकोला मारण्यासाठी हे योग्य कारण वाटतं. नवऱ्याचा विश्वासघात केला म्हणून 24 टक्के बायका नव-याचा मार खायला आणि 13 टक्के पुरुष बायकांना मारायला तयार आहेत 

सासू-सासऱ्यांचा अनादर हे 37 टक्के बायकांना नव-याचा मार खाण्यासाठी तर 28 टक्के पुरुषांना बायकांना मारण्यासाठी योग्य कारण वाटतं महिलांच्या प्रगतीसाठी महिलांनीच एक पाऊल पुढे यायला हवं. पण बायकांनाच नव-याचा मार खाण्यात काहीच गैर वाटत नसेल तर स्त्री पुरुष समानतेचं स्वप्न फक्त स्वप्नच राहणार आहे.