नवी मुंबई: भाजपमध्ये हिंमत असेल तर आजच आमचे सरकार पाडून दाखवावे, अशी गर्जना करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. ते रविवारी नवी मुंबईतील भाजपच्या अधिवेशनात बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी म्हटले की, मुक्ताईनगरमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. माझं म्हणणं आहे की हिंमत असेल तर पुन्हा जनादेशसाठी निवडणूक लावून दाखवा. आम्ही एकटे असलो तरी तुम्हा तिघांवर पुरून उरु, असे सांगत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना प्रतिआव्हान दिले. तसेच शिवसेनेत हिंमत असेल तर त्यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या शिदोरी मासिकावर बंदी घालावी, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज सत्ता येईल, उद्या सत्ता येईल, या भ्रमात राहू नये. विरोधी पक्षाने रस्त्यावर भिडायचं असतं, सरकारशी थेट मुकाबला करायचा असतो. त्यामुळे आपण या सरकारला जेरीस आणल्याशिवाय सोडणार नाही. विरोधाला विरोध करणार नाही. मात्र, जनतेच्या विरोधात काही होत असेल तर सोडायचं नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.
आमचं बरं चाललंय, महाविकास आघाडीत कोणतेही अंतर नाही : उद्धव ठाकरे
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव-भीमा प्रकरणावरून शरद पवार यांनाही लक्ष्य केले. सगळया प्रकारचे पुरावे दिले तरी पवार साहेब म्हणतात एल्गार प्रकरणाचा तपास एसआयटीकडे द्यावा, असे म्हणतात. मात्र, मुख्यमंत्र्यांनी हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) देण्यास मंजुरी दर्शविली, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या चौकशीतून सत्य बाहेर येईल, अशी भीती शरद पवार यांना वाटते. मतांच्या लांगुलचालनाकरता ते तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही यावेळी फडणवीस यांनी केला.