दूध दरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

सरकारने शेतकऱ्यांच्या दूध दरवाढीची मागणी मान्य करावी अन्यथा ९ मे रोजी गाई गुरांसह मंत्रालयासमोर आंदोलनाचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय.

Updated: May 5, 2018, 03:51 PM IST
दूध दरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच title=

मुंबई : दूध दरासाठी तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. औंरगाबाद अहमदनगर नेवासा फाटा इथं प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेतकऱ्यांनी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला. तसंच यावेळी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलंय. सरकारने शेतकऱ्यांच्या दूध दरवाढीची मागणी मान्य करावी अन्यथा ९ मे रोजी गाई गुरांसह मंत्रालयासमोर आंदोलनाचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय.

सरकारने शेतकऱ्याला अनुदान द्यावे

दरम्यान, दूधाचे भाव पाडण्यापेक्षा सरकारने एकतर ग्राहकाला अनुदान द्यावं किंवा उत्पादकांना भाववाढ करून द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. उत्पादकाला प्रतिलिटर दुधामागे २८ ते ३० रुपये लिटर उत्पादन खर्च लागतोय आणि शासन दुधाला अवघा १७ ते  १८ रुपये प्रतिलिटर भाव देतंय हे शेतकऱ्यांचं शोषण असल्याची टीका शेट्टी यांनी केलीय. भेसळ माफियांवर सरकारने कारवाई केली तर अतिरिक्त दुधाचा प्रश्न उरणार नाही असंही राजू शेट्टी यावेळी म्हणाले. 

हमीभावासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन

गायीच्या दुधाला हमीभाव मिळावा यासाठी कोल्हापुरात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत दूध वाटप करत सरकारचा निषेध नोंदवला. पाण्याच्या बॉटल इतकाही दर दुधाला नसल्याने दर द्या नाहीतर फुकट घ्या असा संताप यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना मोफत दुध वाटप केलं.