काँग्रेसचे माजी नेते अजित सावंत यांचे मुंबईत निधन

काँग्रेसचे माजी नेते आणि राजकीय विश्लेषक अजित सावंत यांचे गुरूवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. 

Updated: Mar 7, 2019, 11:09 PM IST
काँग्रेसचे माजी नेते अजित सावंत यांचे मुंबईत निधन title=

मुंबई : काँग्रेसचे माजी नेते आणि राजकीय विश्लेषक अजित सावंत यांचे गुरूवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. गेल्या दोन वर्षांपासून ते कर्करोगाने आजारी होते. माहीम येथील सॉलिटेअर इमारतीतील त्यांच्या निवासस्थानी सावंत यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या शुक्रवारी सकाळी दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

माहीम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर आमदारकीची निवडणूकही लढवली होती. पक्षांतर्गत संघर्षामुळे काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी काही काळासाठी आम आदमी पार्टीतही प्रवेश केला होता. गिरण्यांच्या चाळीत राहणाऱ्या कामगारांना त्यांचे हक्क मिळावेत, यासाठी त्यांनी लढा दिला. कामगारांचे हक्क आणि कामगार कायद्यांबाबत त्यांचा अभ्यास होता.

आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी सर्वात आधी संघटना उभारली. आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या पिळवणुकीविरोधातही त्यांनी आवाज उठवला होता. कामगारांच्या हक्कासाठी 'उठवा झेंडा बंडाचा' हे पुस्तकही त्यांनी लिहिले.