कसाऱ्याहून पहिली लोकल मुंबईच्या दिशेने रवाना

कसारा-मुंबई रेल्वेलोकल सेवा पूर्ववत होण्याची चिन्हं आहेत. कसाऱ्याहून पहिली लोकल मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे. 

Updated: Sep 2, 2017, 09:40 AM IST
कसाऱ्याहून पहिली लोकल मुंबईच्या दिशेने रवाना title=

मुंबई : कसारा-मुंबई रेल्वेलोकल सेवा पूर्ववत होण्याची चिन्हं आहेत. कसाऱ्याहून पहिली लोकल मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे. मुसळधार पावसामुळे मंगळवारपासून कोलमडलेली मुंबईतली रेल्वे सेवा अद्यापही पूर्व पदावर आलेली नाही. मध्य रेल्वेने शुक्रवारी लोकलच्या ३५०  फेऱ्या रद्द केल्या त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. 

तुंबलेल्या पाण्यात तासंतास उभ्या राहिलेल्या लोकलमधील एक्सल मोटरमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे अनेक गाड्या नादुरुस्त झाल्यात. मध्य रेल्वेच्या ताफ्यात १४५ लोकल असून त्यातील १२२ लोकलच्या सहाय्यानं रोज १ हजार ६०० फे-या चालवल्या जातात. 

मात्र ३५  लोकल नादुरुस्त झाल्यामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलंय.आज शनिवार आणि उद्या रविवारीही प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. लोकल सेवांची स्थिती पाहून मध्य रेल्वेने उद्या, रविवारी मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना थोडा दिलासा मिळणार आहे.

ही परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आणखी दोन दिवस जातील, असा दावा रेल्वे प्रशासनानं केलाय. दरम्यान आसनगांव आणि वासिंद स्थानका-दरम्यान मंगळवारी भुस्खलनामुळे झालेल्या दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे केवळ एकच मार्ग सुरु आहे.

सीएसटीच्या दिशेने जाण्याऱ्या अप मार्गाचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे या भागातील प्रवाशांना आणखी दोन ते तीन दिवस याचा फटका बसणार आहे. दरम्यान प्रवाशांनी सहकार्य करावं असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे