रेल्वे फलाटांवरील खुल्या सरबत विक्रीवर अखेर बंदी

काला खट्टा, ऑरेंज ज्यूस ही पेये देखील रेल्वे स्थानकांतील स्टॉलमधून हद्दपार होणार

Updated: Mar 28, 2019, 11:57 AM IST
रेल्वे फलाटांवरील खुल्या सरबत विक्रीवर अखेर बंदी title=

मुंबई: काही दिवसांपूर्वी हार्बर रेल्वेमार्गावरील कुर्ला स्थानकातील फलाटावर घाणेरड्या पद्धतीने लिंबू सरबत तयार करण्यात येत असल्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर आता रेल्वे प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार मध्य रेल्वेने फलाटांवर करण्यात येणाऱ्या खुल्या सरबत विक्रीवर अखेर बंदी घातली आहे. त्यामुळे केवळ लिंबू सरबतच नव्हे, तर काला खट्टा, ऑरेंज ज्यूस ही पेये देखील रेल्वे स्थानकांतील स्टॉलमधून हद्दपार होणार आहेत. 

कुर्ला स्थानकावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. लिंबू सरबत तयार करताना होणारा अस्वच्छ पाण्याचा वापर यामध्ये अगदी स्पष्टपणे दिसत होता. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून खुल्या सरबत विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. 

रेल्वे स्टेशनवरच्या लिंबू-पाण्याचा किळसवाणा प्रकार

मध्य रेल्वेने स्थानकांतील स्टॉलवर सरबत विक्री करण्यास बंदी घातली असली तरी, पश्चिम रेल्वेच्या लोकल स्थानकांवर सरबत किंवा खाद्यपदार्थांबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे. मात्र, सध्या मुंबई विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सर्व स्टॉलची नियमित पाहणी आणि तपासणी करण्यात येत असल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले.