आता, दृष्टीहीन मतदार कुणाच्याही मदतीशिवाय करणार मतदान!

दृष्टीबाधित व्यक्तीची मतदान प्रक्रिया कुठल्याही अडथळ्याविना पार पडावी यासाठी...

Updated: Apr 5, 2019, 01:12 PM IST
आता, दृष्टीहीन मतदार कुणाच्याही मदतीशिवाय करणार मतदान! title=
फाईल फोटो

देवेंद्र कोल्हटकर, झी २४ तास, मुंबई : सुलभ मतदान या घोषणेंतर्गत आगामी लोकसभा निवडणूक दृष्टीबाधित मतदारांना सुलभ व्हावी याकरता, निवडणूक आयोग विशेष प्रयत्न करत आहे. याचाच भाग म्हणून दृष्टीबाधित मतदारांना आता 'डमी बॅलेट पेपर' आणि 'वोटर्स स्लिप' अंधांसाठी वापरल्या जाणाऱ्या 'ब्रेल' लिपीमध्ये उपलब्ध करुन दिलं जाणार आहे. 'नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड ऑफ इंडिया' अर्थात 'नॅब' या दृष्टी बाधितांसाठी काम करणाऱ्या अग्रगण्य संस्थेच्या मुंबईतल्या वरळी मधल्या प्रेसमध्ये सध्या वेगानं काम सुरु आहे. दृष्टी बाधित व्यक्तीची मतदान प्रक्रिया कुठल्याही अडथळ्याविना पार पडावी यासाठी इथे विशेष मेहेनत घेतली जात आहे. भारतीय निवडणूक आयोगानं 'नॅब'च्या ब्रेल प्रेसकडे डमी बॅलेट पेपर, न्यूमरीक स्टिकर्स आणि वोटर्स स्लिप हे साहित्य, ब्रेल म्हणजेच अंधांसाठीच्या लिपीमध्ये तयार करण्याची जबाबदारी दिली आहे. 

सध्या महाराष्ट्रात नोंदणी केलेल्या दृष्टीबाधित मतदारांची संख्या ४८ हजाराच्या आसपास आहे. त्यामुळेच या मतदारांच्या मतदारसंघानुसार ब्रेल लिपीमध्ये, त्यांच्या डमी बॅलेट पेपर्स आणि वोटर्स स्लिप बनवण्यात येत आहेत. त्यासाठी डेटा एन्ट्री, डमी बॅलेट पेपरची तपासणी, छपाई, स्लिप लेबलिंग, पॅकिंग अशी काम वेगाने सुरू आहेत, अशी माहिती नॅबच्या कार्यकारी संचालक पल्लवी कदम यांनी दिलीय. 

मतदान गुप्त पद्धतीने होणं गरजेचं आहे. मात्र, दृष्टीबधितांना मतदानासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागायचा. ते आता करावं लागणार नाही. कारण मतदान केंद्रावर गेल्यावर, त्यांना ब्रेलमध्येच डमी बॅलेट पेपर आणि वोटर्स स्लिप मिळणार आहे. त्या आधारे ते आपला उमेदवार निश्चित करून ईव्हीएम मशीनवर आपल्या पसंतीचा उमेदवार निवडू शकतील. 

दृष्टी बाधितांसाठी नॅबच्या सहकार्यानं निवडणूक आयोगाचे सुरु असलेले प्रयत्न कौतुकास्पद असेच आहेत. त्यामुळे दृष्टीबाधितही मोठ्या जिद्दीने आणि उत्साहात मतदानासाठी उतरणार आहेत. म्हणूनच सजग नागरिकांनीही जागरुक राहत मतदानाचा हक्क बजावणं गरजेचं आहे.