मी कुटुंबवत्सल..मी माझ्या कुटुंबाचा विचार करणारच- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray on Family:  मी माझ्या कुटुंबाचा विचार करणारच असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय.

Pravin Dabholkar | Updated: May 18, 2024, 01:04 PM IST
मी कुटुंबवत्सल..मी माझ्या कुटुंबाचा विचार करणारच- उद्धव ठाकरे  title=
Uddhav Thackeray on Family

Uddhav Thackeray on Family: मी कुटुंबवत्सल आहे. मी फॅमिली मॅन आहे.. मी माझ्या कुटुंबाचा विचार करणारच असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय.. तसंच मी माझ्या पत्नीला लपवत नाही असं विधानही उद्धव ठाकरेंनी केलंय... झी २४ तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी टू द पॉईंटमध्ये उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी हे विधान केलंय.

या मुलखतीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टिका केली. 

मी कुटुंबवत्सल आहे. मी फॅमिली मॅन आहे.. मी माझ्या कुटुंबाचा विचार करणारच..माझी धर्मपत्नी आहे. पत्नी घराची लक्ष्मी असते. महाराष्ट्राच्या परिवारांची मी जबाबदारी घेतलीय, असे ठाकरे म्हणाले.

मला भारत सरकार हवंय. व्यक्तीपेक्षा देश मोठा आहे. देशापेक्षा व्यक्तीने मोठं होता कामा नये, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. चीन ढेंगेखाली घुसलाय तरी यांना उद्धव ठाकरेंना संपवायचे आहे. त्यांना त्यांचे मित्रपक्ष फोडायचे आहेत. पुलवामा यांच्याच दुर्लक्षामुळे घडलं, असा आरोप त्यांनी पंतप्रधानांवर केला. 

मुंबईत शिंदेंचे तीनही उमेदवार चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते, असेही ते म्हणाले. 

इंडिया आघाडी ही तकलादू आघाडी आहे असं म्हटलं जात असून, निवडणुकीनंतर टिकणार नाही. तुमच्याकडे पंतप्रधानपदासाठी चेहरा नसून 5 वर्षात 5 पंतप्रधान देतील अशी टीका नरेंद्र मोदींनी केल्याबद्दल उद्धव ठाकरेंना विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, "आमची आघाडी तकलादू आहे तर मग नरेंद्र मोदी रस्त्यावर का उतरले? आघाडी तकलादू असेल तर नरेंद्र मोदी महाराष्ट्रात 25 ते 30 सभा का घेत आहेत? एकदा म्हणतात पंतप्रधानपदासाठी चेहरा नाही, दुसऱ्यांदा म्हणतात हे दरवर्षी एक पंतप्रधान करतील. म्हणजे आमच्याकडे पंतप्रधानपदाचे चेहरे आहेत".

पुढे ते म्हणाले की, "5,10 किंवा 50 असतील. पण कधीही निवड असणं की नसणं जास्त चांगलं. त्यांच्या भाषेत बोलायचं गेल्यास एकच प्रोडक्ट तुम्ही किती वेळा लाँच करणार? पूर्वी हमाम साबण होता. हमाम आता नव्या रॅपमध्ये अशा जाहिरात केली जायची. पण आतला साबण तोच असायचा. यांचा रॅपही 2014 चा आहे. आम्ही रोजगार, पीकविमा देऊ असं सांगत ते 2014 च्याच जाहिराती परत करत आहेत. म्हणजे यांचं रॅपरही बदललेला नाही. आतला मालपण तोच आहे आणि आवरणही तेच आहेत. तुम्ही किती वेळा तेच प्रोडक्ट विकणार?".  "मी वेडीवाकडी स्वप्नं पाहणाऱ्यांमधील नाही. त्यामुळे आमच्या इंडिया आघाडीचं जे काही ठरलं आहे, त्याला छेद जाईल असं कोणतंही भाष्य कऱणार नाही," असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.