मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला!

मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला आहे

Updated: Jun 18, 2018, 08:37 PM IST

मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आता मंत्रिमंडळ विस्तार निश्चित असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तार करण्याबाबत पक्षाकडून विचारणा करण्यात आलेली असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मुख्यमंत्र्यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिलेलं असून अधिवेशनापूर्वी विस्तार केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मंत्रीमंडळ विस्तारासोबतच उर्वरित महामंडळांचं वाटपही लवकरच होणार असल्याची माहिती मुनगंटीवारांनी दिली.

आदेश बांदेकर राज्यमंत्री

होम मिनिस्टर मालिकेतून घराघरात पोहोचलेले आणि शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे. आदेश बांदेकर हे मुंबईच्या सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आहेत. न्यासाचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आल्यामुळे त्यांना आता राज्य सरकारच्या वेगवेगळ्या सुविधा मिळणार आहेत.

शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर आदेश बांदेकर यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

२०१४ पासून भाजप आणि शिवसेनेचे संबंध कायमच ताणले गेले होते. या संबंधांमध्ये सुधार व्हावा आणि २०१९ साठी भाजप-शिवसेनेची युती व्हावी यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

यानंतर आता आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे आता तरी भाजप-शिवसेनेचे संबंध सुधारणार का हे पाहावं लागणार आहे.