आमदारांच्या विकास निधी वाटपात अन्याय, न्यायालयात जाण्याचा काँग्रेसचा इशारा

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतंच आमदारांना विकास निधीचं वाटप केलं. यात शिंदे गट, शरद पवार गटाच्या आमदारांना निधीचा वर्षाव केला. तर भाजपाच्या प्रशांत बंब यांच्या मतदारसंघात सर्वाधिक निधी दिला. पण दुसरीकडे सर्वात कमी निधी मिळाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 26, 2023, 07:54 PM IST
आमदारांच्या विकास निधी वाटपात अन्याय, न्यायालयात जाण्याचा काँग्रेसचा इशारा title=

मुंबई :  आमदारांना विकास निधी (Fund) देताना काँग्रेस पक्षाच्या आमदारांवर (Congress MLA) अन्याय करण्यात आरोपा काँग्रेसने केला आहे. विकास निधी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना जास्त प्रमाणात वाटण्यात आला आहे. तर काँग्रेसच्या आमदारांना अत्यंत कमी निधी देण्यात आला आहे. काही आमदारांना निधीचे वाटपही झाले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेऊन आमदारांना विकास निधी देण्याची मागणी काँग्रेसने (Congress) केली आहे. विकास निधी नाही दिला तर मात्र काँग्रेस न्यायालयात धाव घेईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनातील मुख्यमंत्री कार्यालयात भेट घेऊन विकास निधीबाबात चर्चा केली. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले यांनी निधी वाटपात असमानता झाल्याचा आरोप केला. काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघासाठी विकास निधी मिळाला पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मंजूर केलेल्या विकास कामांना सरकारने स्थगिती दिलेली आहे ती स्थगितीही उठवावी अशी मागणी करण्यात आली आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन विकास निधीवर निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले आहे. काँग्रेस पक्ष दोन दिवस वाट पाहणार आहे. दोन दिवसात निधी मिळाला नाही तर कोर्टात धाव घेऊ अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. 

मुंबई महापालिकेतील पालकमंत्र्याचे कार्यालय हटवा
मुंबई महानगरपालिकेमध्ये पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कार्यालय स्थापन केलं आहे. पालकमंत्र्यांचे हे कार्यालय तात्काळ बंद केले पाहिजे. मुंबई महानगर पालिकेत पालकमंत्र्यांचे कार्यालय सुरु करुन भाजपाने नवीन परंपरा सुरु केली आहे ती चुकीची आहे. महानगर पालिका स्वायत्त संस्था आहे, तिथे पालकमंत्र्यांचे कार्यालय सुरु करून भाजपा राजकारण करत आहे, हे थांबवले पाहिजे, अशी मागणीही काँग्रेस पक्षाने केली असल्याचे नाना पटोले यांनी सांगितलं.

बाळासाहेब थोरात यांची मागणी
विधिमंडळाचं सभागृह अत्यंत महत्त्वाचे आहे, धोरणात्मक बाबी सोबतच अनेक आमदार आपल्या मतदारसंघाचे प्रश्न घेऊन सभागृहात बोलत असतात. सभागृह चालल्याने त्यांना संधी मिळते. उशिरापर्यंत सभागृह चालवले जाते त्याबद्दल मी विधानसभा अध्यक्षांचे आभार व्यक्त करतो, मात्र चर्चा अधिक विस्ताराने होण्याच्या दृष्टीने आणि मतदारसंघातील प्रश्नांना अधिक न्याय मिळण्याच्या हेतूने अधिवेशनाचा कालावधी पूर्ण करण्यात यावा. चार ऑगस्टपर्यंत अधिवेशन चालवावे अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. 

अधिवेशनामध्ये अनेक छोटे-मोठे प्रश्न उपस्थित करण्यात आले, त्या प्रश्नांना या निमित्ताने वाचा फुटली. प्रशासन जागे झाले, गतिमान झाले. या अत्यंत चांगल्या गोष्टी आहेत या सभागृहाचा हेतू प्रश्न सुटावे हा आहे. त्यामुळे अधिवेशन पूर्ण काळ चालवावे जेणेकरून प्रत्येक सदस्याला न्याय देता येईल असंही थोरात यांनी म्हटलंय.

बाळासाहेब थोरात ही विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य आहे त्यांना या सभागृहाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या भावना अत्यंत महत्त्वाच्या आहे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अमित भावना मांडू त्यावर चर्चा करू आणि योग्य निर्णय घेऊन असे आश्वासन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाला दिलं.