शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी, सापत्न वागणूक मिळत असल्याचा शिंदे गटाच्या खासदाराचा आरोप

लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला 22 जागा लढवायच्या असल्याची सूत्रांनी माहिती दिली असून भाजपाला ही मागणी अमान्य आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाला 5 जागाही मिळणार नाहीत असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 

राजीव कासले | Updated: May 26, 2023, 04:52 PM IST
शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी, सापत्न वागणूक मिळत असल्याचा शिंदे गटाच्या खासदाराचा आरोप title=

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी. शिंदे गट (Shinde Group) आणि भाजप (BJP) यांच्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा घणाघाती आरोप खासदार गजानन किर्तीकर (MP Gajanan Kirtikar) यांनी केलाय. शिवसेना (Shivsena) आता एनडीएचा (NDA) घटकपक्ष असूनही कामं होत नसल्याची तक्रार त्यांनी केलीय. शिंदेबरोबर आलेले आम्ही तेरा खासदार एनडीएचे घटक आहोत आणि घटक पक्षाला तितका दर्जा दिला पाहिजे असं खासदार किर्तीकर यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे देवंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मात्र किर्तीकर यांनी कुठेही असं म्हटलेलं नाही, या कपोकल्पीत बातम्या असल्याचं म्हटलं आहे. 

शिंदे गट-भाजपात वादाची ठिणगी
दुसरीकडे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आगामी लोकसभा निवडणुकीत 22 जागा लढवायच्या आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र भाजप 22 जागा देण्यास तयार नाही असं भाजपच्या गोटातून समजतंय. बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खासदारांसह बैठक झाली. 2019 मध्ये जेवढ्या जागा शिवसेनेनं लढल्या तेवढ्या जागांची मागणी शिंदे गटाची आहे. अमरावतीची जागा अपक्ष नवनीत राणा यांनी जिंकल्यावर भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे ती जागा भाजपच लढेल अशी शक्यता आहे. आता शिंदे गटाची मागणी भाजपने धुडाकवल्यास सत्ताधाऱ्यांतच वाद पेटण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला 22 काय 5 जागाही मिळत नाहीत असा दावा राऊतांनी केलाय. 

खासदारांवर शिंदे नाराज
आपल्याच खासदारांच्या कार्यपद्धतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. बुधवारी संध्याकाळी वर्षा या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिंदेंनी खासदारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. खासदार मविआच्या कार्यकर्त्यांची कामं करत असल्याची तक्रार आल्याने शिंदे नाराज झाल्याची चर्चा आहे. मतदारसंघात प्रभाव वाढवा, कार्यपद्धती बदला अशा सूचना शिंदेंनी कडक शब्दात केल्याची माहिती आहे. 

मातब्बर आमदारांना उतरवणार
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या मातब्बर आमदारांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची रणनीती सर्वच राजकीय पक्ष आखत आहेत. लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024) सत्ताधारी भाजप आणि विरोधकांसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्ताभ्रष्ट करण्याचा चंगच विरोधकांनी बांधलाय. तर काहीही करून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा भाजपचा इरादा आहे. त्यामुळे सातत्याने निवडून येणाऱ्या आमदारांना हुकमी एक्के म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाईल अशी शक्यता आहे. शिंदे गटाकडूनही 40 आमदारांपैकी काहींना लोकसभा निवडणुकीत उतरवलं जाईल अशी शक्यता आहे. दीपक केसरकरांसह काही मातब्बर आमदारांच्या नावाची चर्चा आहे.