संपकरी डॉक्टरांवर 'मेस्मां'तर्गत कारवाई

डॉक्टरांच्या मागण्या मान्य केल्यानंतरही ते संपाच्या भूमिकेवर ठाम राहिल्यानं आपल्याला हा निर्णय घ्यावा लागल्याचं डॉ. तात्याराव लहाने यांनी म्हटलंय

Updated: Aug 7, 2019, 11:18 PM IST
संपकरी डॉक्टरांवर 'मेस्मां'तर्गत कारवाई   title=

मुंबई : 'मार्ड' संघटनेच्या संपाच्या घोषणेला प्रतिसाद देत संपावर गेलेल्या राज्यातील संपकरी डॉक्टरांवर 'अत्यावश्यक सेवा कायद्या'नुसार (मेस्मा) कारवाई होणार आहे. डॉक्टरांच्या या संपाचा फटका अनेक रुग्णांना सहन करावा लागला. रुग्णसेवा ही अत्यावश्यक सेवेत मोडली जाते, त्यामुळे ही सेवा रुग्णांपर्यंत पोहचण्यास अडथळा निर्माण करणाऱ्या डॉक्टरांवर मेस्मांतर्गत कारवाई केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिलीय. 

डॉक्टरांच्या मागण्या मान्य केल्यानंतरही ते संपाच्या भूमिकेवर ठाम राहिल्यानं आपल्याला हा निर्णय घ्यावा लागल्याचं डॉ. तात्याराव लहाने यांनी म्हटलंय. 

उल्लेखनीय म्हणजे, मेस्मा कायद्यानुसार डॉक्टरांना संप करण्यास परवानगी नाही. संपाची परवानगी नाकारल्यानंतरही डॉक्टर संपावर गेले. डॉक्टर कामावर रुजू झाले नाही तर अत्यावश्यक सेवा कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाईल.